
अमळनेर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम; हिंगोणे खुर्दमध्ये म्हशीचे पारडू फस्त
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात गेल्या १३ ते १४ दिवसांपासून विविध भागांत बिबट्याच्या हालचालींच्या घटना सुरू असतानाच हिंगोणे खुर्द शिवारात शनिवारी पहाटे बिबट्याने म्हशीच्या पारडूवर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना सकाळी ६ वाजता उघडकीस आली. संतोष शंकर पाटील यांच्या शेत परिसरात ही घटना घडली असून, पारडूच्या शरीरावरील जखमा आणि हल्ल्याच्या पद्धतीवरून हा हल्ला बिबट्यानेच केला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. या घटनेमुळे हिंगोणे खुर्द परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील नंदगाव, रांजणे, अंतुर्ली, ढेकू, पिलोडा, धुपी, देवळी, मंगरूळ, शिरुड, पिंपळे, ढेकूरोड आदी परिसरात बिबट्या दिसल्याच्या किंवा त्याच्या हालचाली जाणवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यापूर्वी अंतुर्ली येथे घुबड्या नाला परिसरात वासरू आणि गोऱ्ह्यावर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या असून, आता हिंगोणे खुर्द परिसरात म्हशीच्या पारडूवर झालेल्या हल्ल्याची पद्धतही त्याच स्वरूपाची असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून वनविभागाकडून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. काही ठिकाणी पिंजरे व ट्रेप कॅमेरे लावण्यात आले असून गस्तही वाढविण्यात आली आहे. मात्र बिबट्या सातत्याने ठिकाण बदलत असल्याने तो वनविभागाच्या पथकाला चकवा देत असल्याचे चित्र आहे. परिसरात बिबटे एक की दोन असावेत, अशी चर्चा आहे. हिंगोणे खुर्द परिसरातील या नव्या घटनेमुळे बिबट्याचा वावर अद्याप कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. बिबट्याच्या हालचाली वाढल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. शेतात कामासाठी जाताना शक्यतो एकट्याने जाऊ नये, रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळावे, अत्यावश्यक असल्यास सोबत टॉर्च व काठी ठेवावी, तसेच लहान मुलांना शेत परिसरात किंवा अंधाराच्या वेळी एकटे पाठवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पशुधनाचीही रात्रीच्या वेळी सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी. बिबट्या दिसल्यास त्याचा पाठलाग किंवा त्याला पकडण्याचा प्रयत्न न करता तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन वनपाल गुलाब पिंजारी व वनविभागाने केले आहे. बिबट्याच्या सलग हालचालींमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली असून, वनविभागाने या परिसरातील गस्त आणि शोधमोहीम अधिक तीव्र करण्याची गरज व्यक्त होत आहे.
ट्रेप कॅमेरा व पिंजरा लावले
“अंतुर्ली येथे घुबड्या नाला परिसरात वासरू आणि गोऱ्ह्यावर हल्ला व हिंगोणे शिवारात म्हशीच्या पारडूवर झालेला हल्ला हा बिबट्यानेच केलेला असावा. या हल्ल्याची पद्धतही त्याच स्वरूपाची आहे. हिंगोणा शिवारात ट्रेप कॅमेरा व पिंजरा लावण्यात येत आहे.” गुलाब पिंजारी, वनपाल

Leave a Reply