
अमळनेर पोलिसांचे मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन; २४३ जणांवर कारवाई
अमळनेर (प्रतिनिधी) शहर व ग्रामीण भागातील अवैध धंदे, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि कायदा-सुव्यवस्था बिघडविणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यासाठी अमळनेर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत व्यापक कोंबिंग ऑपरेशन राबविले. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २४३ विविध प्रकारच्या कारवाया केल्या असून, जुगार व गावठी दारू प्रकरणी १४ गुन्हे दाखल केले आहेत. विविध ठिकाणी छापे टाकून १ लाख १५ हजार ६४० रुपयांची देशी व गावठी दारू तसेच कच्चे व उकळते रसायन जप्त करण्यात आले. याशिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ५१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या सूचनेनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी, पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व अमळनेर पोलिसांच्या सुमारे ७० कर्मचाऱ्यांनी या कोंबिंग ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला. पोलिसांच्या पथकांनी पैलाड, गांधलीपुरा, झामी चौक, जपान जीन तसेच ग्रामीण भागातील विविध ठिकाणी एकाचवेळी धडक कारवाई केली. या मोहिमेत विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या २५ हिस्ट्रीशीटरच्या घरांची, तसेच १६ हॉटेल व लॉजची तपासणी करण्यात आली. याशिवाय १०० गुन्हेगारांच्या घरांची झडती घेण्यात आली. या कारवाईदरम्यान ५२ जण आढळून आले.
गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ६० जणांवर भारतीय न्यायसंहिता कलम १२६ व १२९ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई केली. तसेच विविध प्रकरणांत न्यायालयीन प्रक्रिया असलेल्या १५ जणांना एनबीडब्ल्यू, ६ जणांना बीडब्ल्यू, तर २१ जणांना समन्स बजावण्यात आले.
वाहतूक नियम तोडणाऱ्यांवरही कारवाई
कोंबिंग ऑपरेशनदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली. मोटार वाहन कायद्यानुसार ४० जणांवर कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी वाहने लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ७ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर मोटार वाहन कायद्यातील कलम ६६, १९२ अन्वये कारवाई करण्यात आली. या कारवायांमधून एकूण ५१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. शहरातील विविध ठिकाणी उघड्यावर तसेच रस्त्यावर मद्यप्राशन करून सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण करणाऱ्या ३२ जणांवर कारवाई करण्यात आली. जुगार खेळणाऱ्या ५ जणांविरुद्ध जुगार कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या ३ जणांविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर पोलिसांचा छापा
दरम्यान, कोंबिंग ऑपरेशनच्या अनुषंगाने पोलिसांनी ग्रामीण भागातील गावठी दारूच्या हातभट्ट्यांवरही धडक कारवाई केली. मठगव्हाण परिसरात किशोर गोरख शिरसाठ (रा. नालखेडा) याच्याकडून देशी दारू जप्त करण्यात आली. तसेच सुनील शांताराम बाविस्कर (रा. नालखेडा), प्रदीप हिरामण सोनवणे (रा. नालखेडा), राजेंद्र कांतीलाल शिंदे (रा. नगाव), महादू ओंकार ठाकरे (रा. चिमणपुरी पिंपळे), किशोर कांतीलाल शिंदे (रा. नगाव), आबा काळू वाघ (रा. नांद्री) आणि विजय विनोद अभंगे (रा. शनीपेठ, पैलाड) यांच्या गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर पोलिसांनी छापे टाकले. या कारवाईत ४१ देशी दारूच्या बाटल्या, १४० लिटर गावठी दारू, १ हजार ४०० लिटर कच्चे रसायन आणि २५० लिटर उकळते रसायन असा एकूण १ लाख १५ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गावठी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे मोठ्या प्रमाणातील कच्चे व उकळते रसायन पोलिसांनी नष्ट केले. अमळनेर शहरासह ग्रामीण भागात अवैध धंदे, गावठी दारू, जुगार, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात पोलिसांनी केलेल्या या व्यापक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आगामी काळातही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply