
डांगरजवळ दुचाकी–चारचाकीची भीषण धडक; गवंडी कामगाराचा मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील डांगर गावाजवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ८ मे रोजी सायंकाळी घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चोपडाई कोंढावळ येथील शिवाजी भगवान सैंदाणे (वय ३८) हे गवंडी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. ते ८ मे रोजी सायंकाळी स्वतःच्या दुचाकीने डांगर येथून चोपडाईकडे जात होते. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास डांगर गावाजवळ समोरून भरधाव येणाऱ्या किया सोनेट कारने (क्रमांक एमएच १९ ईजी ०५८८) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत शिवाजी सैंदाणे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ मदत करून त्यांना उपचारासाठी धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे सैंदाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. मयत शिवाजी सैंदाणे यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून किया सोनेट वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल काशिनाथ पाटील हे करीत आहेत.

Leave a Reply