खवशी येथे घराच्या बांधकामावर काम करताना विजेचा शॉक; मजुराचा दुर्दैवी मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील खवशी येथे घराच्या बांधकामावर काम करत असताना छतावरून गेलेल्या विद्युत तारांचा शॉक लागून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १३ मे रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली. बलीराम फुलसिंग बारेला (वय ३८, रा. अछाली ता. सेंधवा जि. बडवाणी, सध्या रा. अमळगाव) असे मृत मजुराचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बलीराम बारेला हे खवशी येथील प्रदीप पांडुरंग पाटील यांच्या घराच्या बांधकामावर मजुरीचे काम करत होते. नेहमीप्रमाणे ते सकाळी कामावर गेले होते. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ते घराच्या छतावरील भिंतींना पाणी मारण्याचे काम करत असताना छताजवळून गेलेल्या विद्युत तारांचा त्यांना अचानक जोरदार शॉक लागला. शॉक बसल्याने त्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळले. घटनेनंतर परिसरातील नागरिक व सहकारी मजुरांनी तत्काळ धाव घेत त्यांना उपचारासाठी अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देत पंचनामा केला. मृत बलीराम बारेला यांचा चुलत पुतण्या नबी आपसिंग बारेला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत. दरम्यान, बांधकामस्थळी सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव आणि विद्युत तारांजवळ काम करताना घेतली जाणारी निष्काळजीपणा यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *