
वादळी वाऱ्यासह पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनाम्यांचे आमदार अनिल पाटील यांचे आदेश
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात गेल्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत, अशा सूचना माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
यासंदर्भात आमदारांनी राज्याचे कृषी मंत्री व जिल्हाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून शेतकऱ्यांची व्यथा मांडली.
तालुक्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला. २ तारखेला सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यातील चिमनपुरी, पिंपळे खुर्द, पिंपळे बु., अटाळे, शिरसाळे, आर्डी, अनोरे, जवखेडा, नीम, पाडळसरे, कळमसरे, बोहरा, मांडळ, वावडे या गावांसह तालुक्यात सर्वदूर जोरदार वादळ व वाऱ्यासह पाऊस झाल्याने मका, बाजरी, ज्वारी, गहू व इतर पिके आडवी पडली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी काढणीस आलेली मका व गव्हाची पिके कापून ठेवली होती, मात्र ती पिके पावसाच्या पाण्याखाली आल्याने मोठे नुकसान झाले आहे. मारवड, तासखेडा, आमोदे, अंतुर्ली, रंजाणे आदी बोरी काठावरील गावांमध्येही पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असून पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी आमदार अनिल पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply