
अमळनेर पोलिसांच्या धाडसी कामगिरीचा गौरव; अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखताना धाडसी, तत्पर आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अमळनेर पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मानपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
या सन्मानप्राप्त अधिकाऱ्यांमध्ये पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर व शरद काकळीज यांचा समावेश आहे. तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद सोनवणे, सुनील तेली आणि पोलीस कॉन्स्टेबल विनोद संदानशिव व नितीन मनोरे यांनाही गौरविण्यात आले. सदर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठा, धाडस आणि तत्परतेच्या जोरावर समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. गुन्हेगारीविरोधात प्रभावी कारवाई, नागरिकांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन तसेच संकटाच्या प्रसंगी तातडीने मदत करण्याच्या त्यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली. या सन्मानामुळे अमळनेर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक जोमाने व प्रामाणिकपणे कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Reply