
महापुराच्या संकटात जयनिल फाऊंडेशनचा मानवतेचा हात; धाडसी बचावकार्याची राज्यभर दखल
माणुसकीला सलाम! जयनिलच्या सेवाकार्याचे मंत्री, अधिकारी व जनतेकडून भरभरून कौतुक

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर शहरात बोरी नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक भाग जलमय झाले असताना नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक कुटुंबे पुराच्या पाण्यात अडकली होती, तर अनेकांना सुरक्षितस्थळी पोहोचण्याचा मार्गही उपलब्ध नव्हता. अशा भीषण परिस्थितीत जयनिल फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बचाव आणि मदतकार्याची जबाबदारी खांद्यावर घेत मानवतेचे दर्शन घडविले.
पुराच्या वेगवान प्रवाहात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना धीर देणे, तसेच संकटग्रस्त कुटुंबांपर्यंत तातडीने मदत पोहोचविण्याचे काम फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस केले. अनेक स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून नागरिकांना पुराच्या विळख्यातून बाहेर काढत सुरक्षितस्थळी पोहोचविले.
याचबरोबर लायन्स क्लब, रोटरी क्लब, जैन सोशल ग्रुप आणि पत्रकार संघ यांच्या सहकार्याने पूरग्रस्त भागात अन्न, पिण्याचे पाणी, कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. संकटाच्या काळात विविध सामाजिक संस्थांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे अनेक पूरग्रस्त कुटुंबांना मोठा आधार मिळाला.
जयनिल फाऊंडेशनच्या या निःस्वार्थ सेवाकार्याची माहिती नागरिकांमार्फत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, राजकीय नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. सर्वांनी जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील, सर्व स्वयंसेवक आणि मदतकार्यात सहभागी झालेल्या सामाजिक संस्थांचे मनापासून कौतुक करत, संकटाच्या काळात केलेली ही सेवा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार व्यक्त केले.
महापुराच्या भीषण संकटात जयनिल फाऊंडेशनने दाखविलेली तत्परता, सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची भावना यामुळे नागरिकांमध्येही समाधान व्यक्त होत असून, “संकटात धावून जाणारे हातच खरे देवदूत असतात,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. जयनिल फाऊंडेशनचे हे सेवाकार्य अमळनेरच्या सामाजिक इतिहासातील प्रेरणादायी अध्याय ठरत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

Leave a Reply