
साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
अमळनेर (प्रतिनिधी) येथील साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये बुधवारी गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका अनिता बोरसे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बासरीवादक योगेश पाटील, संगीत शिक्षक तुषार पुराणिक तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक दिलीप पाटील यांनी केले. यावेळी मुकेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थिनींनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. इयत्ता आठवी ‘अ’मधील जानवी पाटील, आठवी ‘ब’मधील कनक पाटील, नववी ‘अ’मधील कल्याणी पाटील, नववी ‘ब’मधील लीना पवार, दहावी ‘अ’मधील कल्याणी पाटील आणि दहावी ‘ब’मधील वैदर्भी पाटील यांनी भाषणातून गुरूंबद्दलचा आदर व्यक्त केला.
प्रमुख पाहुणे योगेश पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एक तरी कला जोपासली पाहिजे. कला माणसाला जीवन जगताना खरा आनंद मिळवून देते. विद्यार्थिनींनी भविष्यात संस्कारी व जबाबदार व्यक्ती बनावे, असा संदेश त्यांनी दिला. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी कवी कालिदास यांची कथा सांगत गुरूंचे जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. तसेच गुरुपौर्णिमेला ‘व्यास पौर्णिमा’ का म्हटले जाते, याविषयी विद्यार्थिनींना माहिती दिली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बासरीवादक योगेश पाटील यांनी बासरीवर सुरेल गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा पाटील आणि श्रावणी पाटील यांनी केले, तर पुनश्री चौधरी यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षकवृंद व विद्यार्थिनींची उपस्थिती होती.

Leave a Reply