
विश्व मानव रुहानी केंद्रातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबिर; २५ भाविकांचे स्वयंस्फूर्त रक्तदान
अमळनेर (प्रतिनिधी) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त विश्व मानव रुहानी केंद्र, लाईट हाऊस सेंटर, अमळनेर येथे २९ जुलै रोजी सामाजिक जाणीव जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मानवतेच्या सेवेला प्राधान्य देणाऱ्या या उपक्रमात अमळनेर, एरंडोल, पारोळा तसेच परिसरातील विविध भागांतून आलेल्या भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिबिरात जवळपास २५ भाविकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.
विश्व मानव रुहानी केंद्र हे २००५ पासून मानवतेच्या सेवेत कार्यरत असून संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम राबविले जातात. संस्थेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, आरोग्य शिबिरे, धार्मिक यात्रांच्या मार्गावर मोफत वैद्यकीय व अन्नदान शिबिरे, गरजूंना मोफत ब्लँकेट वाटप, पूरग्रस्तांना मदत, कावड यात्रेदरम्यान सहाय्यता शिबिरे तसेच अनाथ, आजारी आणि वृद्धांसाठी विविध सामाजिक सेवा उपक्रम राबविले जातात. महाराष्ट्रातील सप्तशृंगी देवी यात्रेदरम्यान मोफत अन्नदान, पंढरपूर यात्रेत वैद्यकीय शिबिर तसेच इतर सामाजिक उपक्रमही संस्थेच्या माध्यमातून राबविले जातात. संस्थेचे स्पिरिच्युअल हेड संत बलजीत सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हे सेवाकार्य सुरू आहे.
याच सेवाभावी उपक्रमांचा भाग म्हणून गुरुपौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. शिबिरात सहभागी रक्तदात्यांना केंद्राच्या वतीने अल्पोपहार व प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता भजन गायनाने झाली. त्यानंतर सकाळी ११ वाजता संत बलजीत सिंह महाराज यांचे प्रवचन एलईडी स्क्रीनवर दाखविण्यात आले. दुपारी १२ वाजता सामूहिक ध्यानसाधना घेण्यात आली. या आध्यात्मिक कार्यक्रमासोबतच रक्तदानाच्या सामाजिक उपक्रमामुळे गुरुपौर्णिमेचा दिवस सेवाभावाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सुमारे १ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. अमळनेरसह एरंडोल, पारोळा आणि परिसरातील विविध भागांतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घेतला. शिबिराच्या आयोजनासाठी आरोग्य विभाग तसेच भाऊसाहेब हिरे शासकीय रक्तपेढीच्या वैद्यकीय पथकाने सहकार्य केले. विश्व मानव रुहानी केंद्राच्या स्थानिक प्रबंधक कमिटीने सर्व संगत, सदस्य तसेच रक्तदान शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या आरोग्य विभाग आणि वैद्यकीय पथकाचे आभार मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी अमळनेर परिसरातील साधक आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आध्यात्मिक साधनेसह रक्तदानाच्या माध्यमातून मानवसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम सामाजिक जाणीव असलेला आदर्श उपक्रम ठरला.

Leave a Reply