
पिकअप व्हॅनमध्ये बैलांची दाटीवाटीने वाहतूक ; शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) पिकअप व्हॅनमध्ये चार बैल दाटीवाटीने कोंबून वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्याविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरांसह पिकअप व्हॅन असा एकूण ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ११ मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गलवाडे रस्त्यावरील जे. पी. हॉटेलजवळ तीन वाहनांमधून गुरांची वाहतूक सुरू असल्याची माहिती काही कथित गो-रक्षकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर संबंधित वाहने अडवून ठेवण्यात आली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही वाहने पोलीस ठाण्यात जमा केली. पोलिसांनी चौकशी केली असता संबंधित गुरे शेतकऱ्यांची असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, एका वाहनात दोन एकांत चार बैल दाटीवाटीने भरलेले आढळून आले. याप्रकरणी गणेश डिगंबर पाटील (रा. शिरसमणी, ता. पारोळा) यांनी त्यांच्या पिकअप व्हॅन क्रमांक एमएच १९ सीवाय ६६९४ मध्ये चार गुरे कोंबून भरल्याचे निदर्शनास आले.
वाहतूक पोलीस संजय बोरसे यांच्या फिर्यादीवरून गणेश पाटील यांच्या विरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११ (१)(ड)(ई)(फ)(क) तसेच मुंबई पोलिस कायदा कलम ११९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी २ लाख ५० हजार रुपये किमतीची पिकअप व्हॅन व १ लाख ९० हजार रुपये किमतीचे चार बैल असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.

Leave a Reply