
‘शविआ’च्या बैठकीला दांडी मारून मुख्याधिकारी बदलीसाठी मुंबईला?; शहर विकास आघाडीचा संताप, आक्रमक भूमिकेचा इशारा
‘शविआ’तर्फे निषेध; आता संयमित भूमिकेऐवजी घेणार आक्रमक पवित्रा

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. २२ जून रोजी दुपारी ४ वाजता शहर विकास आघाडी (शविआ) व प्रमुख पदाधिकारी यांची पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे तसेच सर्व विभागप्रमुखांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र नियोजित बैठकीच्या वेळी मुख्याधिकारी पालिकेत नसून मुंबईला गेल्याचे समोर आल्यानंतर शहर विकास आघाडीने तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेचा निषेध केला आहे.
अमळनेर येथील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. २२ जून रोजी दुपारी ४ वाजता शहर विकास आघाडी व प्रमुख पदाधिकारी यांची पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे व पालिकेतील सर्व विभागप्रमुखांची बैठक होणार होती. याबाबत ‘शविआ’च्या गटनेत्या जयश्रीताई पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांशी फोनवर बोलणी केली होती. पत्रही दिले होते. मुख्याधिकारींनीही पत्रोत्तर देऊन संमती दर्शविली होती. त्याप्रमाणे सोमवारी ‘शविआ’चे सर्व नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी दुपारी साडेतीन वाजता एकत्र जमले. मात्र, त्यावेळी त्यांना कळाले, की मुख्याधिकारी पालिकेत नसून मुंबईला आहेत. विशेष म्हणजे मुंबईला जाण्यापूर्वी त्यांनी सौ. जयश्रीताई पाटील यांना गटनेत्या या नात्याने बैठक पुढे ढकलण्याबाबत लेखी किंवा फोनद्वारेे कळविणे गरजेचे होते. मात्र, ते असे काहीही न करता बिनधास्त निघून गेले. दुपारी 4 वाजता सौ. जयश्रीताई पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांशी फोनवर बोलणी करून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल तीव्र नाराजी व संतप्त भावना व्यक्त केल्या.
प्रत्यक्षात मुख्याधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊनच ‘शविआ’ने मोर्चाऐवजी बैठकीच्या पर्यायाला मान्यता दिली होती. मात्र, सदर बैठकीत आपले वाभाडे निघतील, या भीतीने मुख्याधिकाऱ्यांनी पलायन करणे उचित समजले असेल. सौ. जयश्रीताई पाटील यांना त्यांनी नगरविकास विभागातून बोलविणे आल्याने मला जावे लागले, असे सांगितले. रविवारी मंत्रालय व सचिवालयाला सुटी असते. असे असताना मुख्याधिकाऱ्यांना मंत्रालय किंवा सचिवालयातून रविवारी कुठून व कोणी कॉल केला असावा, असे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रत्यक्षात अमळनेरच्या पालिकेचे एकूणच वातावरण पाहता येथून निघून गेलेलेच योग्य राहील, अशी त्यांची बऱ्याच दिवसांपासून मानसिकता होतीच. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले, की ते बदली करून घेण्यासाठीच मुंबईला गेले आहेत.
आत्मसन्मानाची जाणीव करून देऊ
मुख्याधिकाऱ्यांचे वागणे त्यांच्या पदाला आणि जबाबदारीला शोभणारे नाही. अत्यंत संवेदनशील विषयांबाबतच्या नियोजित बैठकीचे त्यांना गांभीर्य नाही. अचानक जाणे अपरिहार्य होते, असा विचार केला तरी शिष्टाचाराचा व सन्मानाचा भाग म्हणून त्यांनी गटनेत्या या नात्याने मला तोंडी अथवा लेखी कळविणे गरजेचे होते. आमचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी हातची कामे सोडून बैठकीच्या नियोजित वेळेवर उपस्थित होते आणि हे महाशय मात्र गायब होते. उद्या किंवा परवा येतो, असे त्यांनी मला फोनवर सांगितले आहे. ते आल्यानंतर आमच्या अस्तित्वाची आणि आत्मसन्मानाची जाणीव आम्ही त्यांना निश्चितपणे करून देऊ.
– जयश्रीताई पाटील, गटनेत्या, ‘शविआ’.

Leave a Reply