पहिले लग्न लपवून केले दुसरे लग्न; एसआरपी जवानाकडून महिलेची सुमारे सहा लाख रुपये व २१ तोळे सोन्याची फसवणूक

Ai.. Pic

अमळनेर (प्रतिनिधी) पहिले लग्न झालेले असताना ते लपवून एका महिलेशी दुसरे लग्न करत तिच्याकडून २१ तोळे सोने, ५ लाख ९८ हजार रुपये तसेच दरमहा १० हजार रुपये घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एसआरपीमध्ये कार्यरत असलेल्या जवानाविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुरेखा एकनाथ साळुंखे (रा. मराठा मंडपाच्या मागे, दोंडाईचा, ता. शिंदखेडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, १६ जून २०२२ रोजी त्यांचा विवाह मुंदडा नगर येथील विनोद भटू सोनवणे याच्याशी झाला होता. विनोद सोनवणे हा नागपूर येथे नोकरीवर असल्याने सुटीच्या काळात दोघे मुंदडा नगर येथे एकत्र राहत होते. दरम्यान, विनोद सोनवणे याने बुलेट मोटारसायकल खरेदीसाठी ९८ हजार रुपये घेतले. त्यानंतर २१ एप्रिल २०२३ रोजी महिलेच्या नावावर शेती खरेदी करण्याचे आमिष दाखवत तिच्याकडील २१ तोळे सोने मोडून घेतले तसेच ५ लाख रुपयेही घेतले. मात्र, शेती खरेदी करण्यात आली नाही. पैसे परत मागितल्यावर तो शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच आणखी खर्च असल्याचे सांगून दरमहा १० हजार रुपयेही घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

३ मे २०२६ रोजी सुरेखा साळुंखे या जळगाव येथील मानस हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल झाल्या असता, त्यांच्या नावाऐवजी ‘वैशाली’ असे नाव नोंदविण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत विचारणा केल्यावर विनोद सोनवणे याने वैशाली ही त्याची पहिली पत्नी असून तिच्या नावावरील कागदपत्रांमुळे खर्च कमी येईल, असे सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर चौकशी केली असता विनोद सोनवणे याचे पहिले लग्न झाले असून त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा व एक मुलगी असल्याचे समोर आले. त्यानंतर सुरेखा साळुंखे यांनी त्याच्याकडे २१ तोळे सोने, ५ लाख रुपये आणि बुलेटसाठी दिलेले ९८ हजार रुपये परत मागितले. मात्र, तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी विनोद भटू सोनवणे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ८५, ३१६(२) व ८२(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद काकळीस करीत आहेत. दरम्यान, प्राथमिक चौकशीत संबंधित व्यक्ती एपीआय नसून एसआरपी दलात कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले असून तो सध्या काश्मीर येथे कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *