
पांढरे कपडे घालून समाजसेवेचा आव आणणारा बिल्डर सरजू गोकलानी यांचा खरा चेहरा उघड !!!
गुन्हा दाखल होताच पोलिसांसमोर केली गयावया..!
अमळनेर (प्रतिनिधी) पांढरे कपडे घालून समाजसेवेचा आव आणणारे बांधकाम व्यावसायिक सरजू गोकलानी यांचा खरा चेहरा अमळनेर जनतेसमोर आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने अशा व्यक्तींवर आणि एखाद्या व्यक्तीविषयी ते पसरवत असलेल्या नरेटीवर किती विश्वास ठेवावा, अशी चर्चा आता अमळनेरमध्ये रंगू लागली आहे.
अमळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत जितेंद्र उर्फ जितू ठाकूर, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून उभे राहिले, तेव्हा डोळ्यांत फक्त एकच स्वप्न होतं, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढण्याचं. पण त्या लढाईत त्यांच्यासमोर सरजू गोकलानी सारख्या व्यक्तीने पडद्या आड राहून खोटा नरेटिव्ह पसरवला. हा विरोध केवळ राजकीय नव्हता-तो भीतीतून जन्मलेला होता. कारण त्यांना ठाऊक होतं, जितू ठाकूर पालिकेत आले तर त्यांच्या काळ्या उद्योगांवर, व्यवहारांवर गदा येईल. म्हणूनच त्यांच्याविरुद्ध खोटा नरेटिव्ह रचला गेला. बदनामीची सावली पसरवली गेली. अफवा पेरल्या गेल्या. आणि दुर्दैवाने त्या कटकारस्थानात ते यशस्वी ठरले.
पण पराभव म्हणजे अंत नव्हे. तो नव्या लढाईची सुरुवात असते. ज्या वेळी शिंदे कुटुंबाचं घर पाडलं गेलं, त्यांच्या संसाराची राख झाली, तेव्हा कितीजण उभे राहिले? तेव्हा बदनाम झालेला जितू ठाकूरच त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहिला. न डगमगता. न घाबरता. कारण त्यांची लढाई सत्तेसाठी नव्हती-ती न्यायासाठी होती. आणि काळाच्या न्यायाने काय दाखवून दिलं?
“मै अमळनेर का किंग हु, मेरा कोई बाल बांका नही कर सकता” अशा गर्वात वावरणारे सरजू गोकलानी हे गुन्हा दाखल होताच पोलिसांच्या गयावया करताना दिसले. त्यांना वाटायचं की पैशाने सर्व काही विकत घेता येतं, त्यांना कायद्याने त्याची जागा दाखवली. कारण कायद्यापेक्षा कोणीही मोठं नसतं. सरजू गोकलानीचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे. ते जुन्या बसस्टँडजवळ सिमेंटच्या गोण्या विकायचे. त्यामुळे हा माणूस एवढ्या कमी काळात कोट्यवधींचा मालक कसा झाला? लफड्याच्या प्रॉपर्ट्या भाडेकरूसकट स्वस्तात विकत घेणे, नंतर साम-दाम-दंड-भेद वापरून ती जागा मोकळी करून त्यावर टोलेजंग इमारती उभ्या करणे-हा त्याचा खरा व्यवसाय आहे. यात शेकडो गोरगरिबांची घरे उद्ध्वस्त झाली. त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंवर त्यांनी इमले बांधले. गरीबांना त्रास देऊन, त्यांची घरे पाडून कोट्यवधी कमावले. पैसा बोलतो, असा त्यांचा आविर्भाव असतो. आणि त्यांच्या विरोधात आवाज उठवणारा कोणी नाही, अशी त्यांची समजूत होती.
पण ही समजूत चुकीची आहे
आज अमळनेर पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता गुन्हा दाखल करून गरीब कुटुंबाला न्याय दिला. त्याबद्दल पोलीस निरीक्षक व संपूर्ण पोलिस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार. ही लढाई वैयक्तिक नाही. ही लढाई आहे, ज्यांनी गरीबांच्या घरांच्या राखेवर महाल बांधले, त्यांना जनतेच्या न्यायालयात उभं करण्याची. आणि लक्षात ठेवा- कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. आणि अन्यायाविरुद्ध उभा राहणारा आवाज कधीच पराभूत होत नाही.
कायदा सर्वांसाठी समान…
जितू ठाकूर घाबरत नाही. निवडणुकीत पराभव झाला, कारण ते सामान्य कुटुंबातून आले आहेत आणि सर्वसामान्यांच्या बाजूने उभे आहेत. हाच त्यांच्या पोटातला खरा दुखरा मुद्दा होता. “हा पालिकेत आला तर आपले काळे धंदे बंद होतील,” या भीतीनेच त्यांनी त्यांत्याविरुद्ध मोहिमा राबवल्या. पत्रकारिता करतानाही ते व्हाईट कॉलरवाल्यांविरुद्ध लढले. सर्वसामान्यांना कधीच त्रास दिला नाही. आजही त्यांची वक्रदृष्टी फक्त काळे धंदे करणाऱ्यांवर आहे. चांगले कोण आणि वाईट कोण हे ओळखायला शिका, एवढीच विनंती आहे.
माझ्या अमळनेरकर मायबापांनो, जर मी कधी एखाद्या गोरगरीब कुटुंबाला त्रास दिला असेल, तर माझ्या थोबाडीत द्या. पण जर कुठे अन्याय होत असेल, अर्ध्या रात्री मला आवाज द्या. हा जितू ठाकूर त्वरित तुमच्या पाठीशी उभा राहील. कुणाचीही भाडभिड ठेवू नका. कारण कायदा सर्वांसाठी समान आहे.

Leave a Reply