
पातोंडा शाळेत विद्यार्थी निर्मित कला व कार्यानुभव प्रदर्शन उत्साहात; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दिला वाव
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पातोंडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या शाळेत विद्यार्थी निर्मित कला व कार्यानुभव प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणात झाले. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलात्मक वस्तूंनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा, पातोंडा येथील मुख्याध्यापक सुनीता प्रदीप लोहारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुलांची व मुलींची शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. यामध्ये प्रियंका शिंदे, वैशाली सोनवणे, सुषमा तायडे, छाया इसे, स्वप्नील शिंदे व सागर भोई यांचा समावेश होता. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी हस्तकला, शैक्षणिक मॉडेल्स, पुनर्वापरातून तयार केलेल्या वस्तू, चित्रकला आदी विविध प्रकारच्या कलाकृती सादर केल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळाली असून त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध झाले. यावेळी बोलताना मुख्याध्यापक सुनीता लोहारे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला वाव देण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन अत्यंत गरजेचे आहे. यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या कौशल्यांचा विकास होतो.” कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुषमा तायडे व छाया इसे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रदर्शनाला पालक व ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave a Reply