
‘केरला स्टोरी 2’द्वारे तरुणींमध्ये जागरूकता; रोटरी क्लब अमळनेरचा स्तुत्य उपक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) तरुणींमध्ये सामाजिक व वैयक्तिक सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब व रोट्रॅक्ट क्लब अमळनेर यांनी ‘केरला स्टोरी 2’ या चित्रपटाचा मोफत शो आयोजित करून स्तुत्य उपक्रम राबविला. या उपक्रमाला विद्यार्थिनी व पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
वय वर्ष १५ ते २१ या गटातील मुलींसाठी एस.एस. सिनेप्लेक्स येथे या चित्रपटाचे विशेष प्रेक्षण ठेवले होते. वास्तव घटनांवर आधारित कथानकामुळे चित्रपट पाहताना अनेक मुली भावूक झाल्या. या माध्यमातून तरुणींना योग्य व अयोग्य नात्यांबाबत सजग राहण्याचा संदेश देण्यात आला. रविवारी आयोजित पहिल्या शोमध्ये १४७ मुलींनी सहभाग घेतला. त्यानंतर वाढत्या प्रतिसादामुळे सोमवार व मंगळवारी दुपारी ३ ते ६ या वेळेत आणखी तीन शो घेण्यात आले, ज्यामध्ये सुमारे ४५० मुलींनी सहभाग नोंदविला. यानंतर बुधवारी आणखी एक शो आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या उपक्रमातून तरुणींना संभाव्य फसवणूक, भावनिक दबाव किंवा चुकीच्या मार्गाकडे नेणाऱ्या परिस्थितींबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच पालकांनीही आपल्या मुलींशी संवाद ठेवून योग्य मार्गदर्शन करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. या प्रकल्पासाठी रोटरी व रोट्रॅक्ट क्लबच्या सर्व सदस्यांनी तन, मन व धनाने सहभाग नोंदविला. यामध्ये अध्यक्ष देवेंद्र कोठारी, ध्रुव पारख, सेक्रेटरी आशिष चौधरी, निधीश कोचर, प्रोजेक्ट चेअरमन पूनम कोचर, रोहित सिंघवी, मोनीश माखिजा, शाहू निकम आदींसह अनेक सदस्य उपस्थित होते.
या उपक्रमामुळे तरुणींमध्ये जागरूकता निर्माण झाल्याचे समाधान आयोजकांनी व्यक्त केले असून, अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम पुढेही राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply