
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘जनसेवा सप्ताह
अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर विधानसभा मतदारसंघात २२ जुलैपासून ‘जनसेवा सप्ताह’ साजरा करण्यात येणार असून, या निमित्ताने २२ शाखांचे उद्घाटन, पुष्पार्पण, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार तसेच जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे निरीक्षक, माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. २२ जुलै रोजी सकाळी १०.१० वाजता अमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजेपासून अमळनेर शहरातील विविध प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखांचे उद्घाटन व फलकांचे अनावरण करण्यात येईल. तसेच सायंकाळी ५ वाजेपासून ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये पक्षाच्या शाखांचे फलक अनावरण करण्यात येणार आहे. या दिवशी एकूण २२ शाखांचे उद्घाटन करून स्व. अजितदादा पवार यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
जनसेवा सप्ताहांतर्गत २८ जुलैपर्यंत महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता व माल्यार्पण, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण तसेच विविध सामाजिक आणि जनहिताचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या सप्ताहात अमळनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व फ्रंटल सेलचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला अध्यक्षा, विविध सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी पदाधिकारी, सरपंच आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील आणि शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी केले आहे. “घड्याळ तेच, वेळ नवीन” या संकल्पनेतून पक्ष संघटना अधिक बळकट करणे, जनतेशी संपर्क वाढविणे आणि जनसेवेचा वसा अधिक प्रभावीपणे पुढे नेणे हा या जनसेवा सप्ताहाचा प्रमुख उद्देश असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply