राजकीय सूडबुद्धीतून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल : माजी आमदार शिरीष चौधरी

अमळनेर (प्रतिनिधी) नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात माझ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा हा वस्तुस्थितीवर आधारित नसून राजकीय सूडबुद्धीने प्रेरित आहे. माझी राजकीय प्रतिमा मलिन करणे, जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे आणि माझा आवाज दाबणे हा या कारवाईमागील खरा उद्देश असल्याचा आरोप माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केला आहे. या प्रकरणाशी माझा कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नसून, कायदेशीर मार्गाने सत्य जनतेसमोर आणणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

नंदुरबार शहरातील विविध समाजांच्या सभागृहांसाठी व मंदिरांसाठी मंजूर झालेल्या सुमारे नऊ कोटी रुपयांच्या विकास निधीबाबत कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत चौधरी यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कोणतीही निष्पक्ष चौकशी न करता व सर्व बाजू पडताळून न पाहता ही कारवाई करण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. चौधरी यांनी म्हटले आहे की, संबंधित पत्र त्यांनी तयार केलेले नाही, त्यावर त्यांची स्वाक्षरी नाही आणि ते पत्र त्यांनी कोणाकडून आणलेलेही नाही. उलट संबंधित नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीच ते पत्र डॉ. विजयकुमार गावित यांच्या कार्यालयात जमा केले तसेच तेच पत्र मंत्रालयात घेऊन गेल्याचे त्यांनी स्वतः पोलीसांना दिलेल्या जबाबात नमूद केले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

आपली भूमिका केवळ लोकप्रतिनिधी म्हणून विकासकामांसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे शिफारस करण्यापुरतीच मर्यादित होती, असे सांगताना चौधरी म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी अशाच प्रकारे शिफारस करीत असतो. मग विकासकामासाठी शिफारस करणे हा गुन्हा आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संबंधित पत्र बनावट असल्याचा आरोप होत असेल तर त्याची फॉरेन्सिक तपासणी करून सत्य समोर आणावे. पत्र कोणी तयार केले, कुठून आले आणि कोणी सादर केले, याचा निष्पक्ष तपास व्हावा. मात्र, या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून केवळ शिफारस केली म्हणून गुन्हा दाखल करणे न्याय्य नसल्याचे त्यांनी म्हटले. याशिवाय कथित प्रकार मंत्रालयाशी संबंधित असल्याचे सांगितले जात असताना नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यामागील कायदेशीर आधार काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शासनाची फसवणूक झाल्याचा दावा असेल तर तक्रार शासनाच्या सक्षम अधिकाऱ्याने किंवा ज्यांच्या नावाचा कथित गैरवापर झाला, त्या संबंधित व्यक्तीने करणे अपेक्षित होते, असेही त्यांनी नमूद केले.

चौधरी यांनी पुढे सांगितले की, कथित पत्रांनंतर शासनाकडून एक रुपयाचाही निधी वितरित झालेला नाही किंवा त्या निधीचा कुठेही वापर झालेला नाही. त्यामुळे अपहार झाल्याचा कोणताही ठोस पुरावा नसताना आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप कोणत्या आधारावर करण्यात आला, याचे उत्तर संबंधित यंत्रणांनी द्यावे. या प्रकरणातील सर्व आवश्यक कागदपत्रे आपण संबंधित यंत्रणांसमोर सादर केली असून न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील पाच ते सहा महिन्यांपासून राजकीय सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल करून बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, सत्याचा विजय निश्चित होईल, कोणत्याही दबावाला वा धमकीला बळी पडणार नाही आणि शेवटपर्यंत कायदेशीर लढा सुरू ठेवणार असल्याचा निर्धार माजी आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *