अमळनेर वैश्यवाणी (शेटे) समाज मंडळातर्फे खान्देशातील ९० हून अधिक विद्यार्थ्यांचा सन्मान

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर वैश्यवाणी (शेटे) समाज मंडळातर्फे रविवारी (दि. १२ जुलै) सकाळी ११ वाजता शहरातील इंदिरा भवन येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खान्देशातील ९० हून अधिक गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करताना मान्यवरांनी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त, आत्मविश्वास आणि स्पष्ट ध्येय निश्चितीच्या बळावर जीवनात मोठे यश संपादन करता येते, असा संदेश दिला. या सोहळ्यात शिवाजी रामदास भदाणे (अमळनेर), चोपडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजीव शेटे, नाशिक येथील समाजाध्यक्ष गजानन दलाल, सेवानिवृत्त सैनिक शिवदास शेटे आणि चहार्डी येथील प्रगतशील शेतकरी राजेश शेटे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. बदलत्या काळात कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व, स्पर्धा परीक्षांची तयारी, तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर तसेच सामाजिक मूल्यांचे जतन याविषयी त्यांनी सविस्तर विचार मांडले.  सोहळ्यानंतर शेटे बंधू केटर्सचे संचालक राजेंद्र शेटे, सुनील शेटे आणि किरण शेटे यांच्या वतीने उपस्थितांसाठी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमळनेर वैश्यवाणी (शेटे) समाज मंडळाचे अध्यक्ष किरण तायडे, उपाध्यक्ष योगेश शेटे, कार्याध्यक्ष संजय शेटे, सचिव पंकज शेटे, खजिनदार गिरीश शेटे, संघटक राकेश शेटे, सल्लागार शिवाजी रामदास भदाणे, बळीराम वाणी, शिवदास शेटे, राजेंद्र देसले तसेच मंडळाचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम शेटे, अविनाश शेटे, धिरज शेटे, शुभम शेटे, निखिल शेटे, मयुर शेटे, साहिल शेटे आणि दर्शन शेटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन राकेश शेटे आणि जान्हवी सोनवणे यांनी केले. अध्यक्ष किरण तायडे आणि कार्याध्यक्ष संजय शेटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *