
अमळनेरात घाणीचा विळखा; नाल्यांची सफाई रखडल्याने मच्छरांचा प्रकोप वाढला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात सध्या घाणीचे साम्राज्य आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मोठ्या नाल्या व गटारांची अनेक दिवसांपासून सफाई न झाल्याने परिसरात मच्छरांचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरातील विविध भागातील स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गटारांमध्ये साचलेले घाण पाणी आणि कचरा हे मच्छर वाढण्याचे मुख्य कारण ठरत आहे. परिणामी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून अनेक मुले ताप व इतर आजारांनी त्रस्त आहेत. या समस्येबाबत अमळनेर नगर परिषदेला अनेक वेळा कळवूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. नाल्यांची नियमित सफाई आणि मच्छर नियंत्रणासाठी औषध फवारणी न झाल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. शहरवासीयांनी प्रशासनाने तात्काळ स्वच्छता मोहीम राबवून गटारांची सफाई व दुरुस्ती करावी तसेच मच्छर नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास ही समस्या मोठ्या आरोग्य संकटात रूपांतरित होऊ शकते, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. दरम्यान, लवकरात लवकर कारवाई न झाल्यास सामूहिक आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Leave a Reply