घराला कुलूप लावून ताबा घेतल्याचा आरोप; घरातील साहित्य फेकून दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील न्यू प्लॉट परिसरात एका घराला परस्पर कुलूप लावून ताबा घेतल्याचा तसेच घरातील साहित्य बाहेर फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राजुसिंग बाबूसिंग परदेशी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, न्यू प्लॉटमधील शनी मंदिर गल्ली येथील टी.पी. क्रमांक ४०/१ हे घर त्यांनी २०१८ मध्ये खरेदी करून स्वतःच्या नावावर केले आहे. हे घर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिले होते. विद्यार्थी नियमितपणे या ठिकाणी अभ्यास करत होते. १० जून रोजी परदेशी यांचा मुलगा शुभम आणि इतर विद्यार्थी अभ्यास करून घराला कुलूप लावून निघून गेले होते. त्यानंतर १४ जून रोजी सकाळी ते परत आले असता घराच्या दरवाजाला दुसरे कुलूप लावलेले आढळून आले. यावेळी घटनास्थळी नरेंद्र जयकृष्ण रामदासी व त्यांची आई उपस्थित होते. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, यावेळी संबंधितांनी “हे घर आमचे असून चार-पाच वर्षांपासून आम्ही सहन करत आहोत,” असे सांगत घराला कुलूप लावल्याची कबुली दिली. तसेच पुन्हा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी येथे पाठविल्यास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय घरातील काही साहित्य बाहेर फेकून देण्यात आले असून इतर सामान घरातच ठेवण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही अडथळा निर्माण झाला आहे. राजुसिंग परदेशी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात नरेंद्र जयकृष्ण रामदासी व त्यांच्या आईविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम ३३०(१), ३२९(४) व ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *