
महसूल पथकाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष; अवैध मुरूम वाहून नेणारा डंपरचालक पसार
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील मंगलग्रह मंदिराच्या मागील बाजूस अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून डंपर पळवून नेणाऱ्या अज्ञात चालकाविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंडल अधिकारी नरेंद्रकुमार देविदास धनराळे यांनी याबाबत फिर्याद दिली असून, डंपर क्रमांक एमएच १४ सीपी ७२७५ वरील अज्ञात चालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीनुसार, १३ सप्टेंबर रोजी दुपारी १२.२० वाजेच्या सुमारास प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी फोनद्वारे मंगलग्रह मंदिराच्या मागील बाजूस मुरूम उत्खनन सुरू असल्याची माहिती देत तलाठ्यासह घटनास्थळी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंडल अधिकारी नरेंद्रकुमार देविदास धनराळे व शहर ग्राम महसूल अधिकारी अदिती संतोष जरे हे मंगलग्रह मंदिराच्या दिशेने जात असताना दगडी दरवाजाजवळ एक डंपर येताना दिसला. महसूल पथकाने डंपर थांबविण्याचा इशारा केला. मात्र चालकाने इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून डंपर पळवून नेला. महसूल पथकाने डंपरचा पाठलाग केला. अमळनेर बसस्थानकाच्या अलीकडे डाव्या बाजूस डंपर टाकल्यानंतर इस्लामपुरा परिसरातील दुर्गा हॉस्पिटलजवळ पुन्हा तो अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चालकाने डंपर थांबविला नाही. यावेळी डंपरचा क्रमांक एमएच १४ सीपी ७२७५ असल्याचे निदर्शनास आले. चालकाला समजावून सांगूनही त्याने डंपर न थांबवता रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या फिर्यादीवरून अज्ञात डंपरचालकाविरुद्ध
अमळनेर पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुरनं. ४७६/२०२६ अन्वये मोटार वाहन अधिनियम कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक यांच्या आदेशान्वये पोलीस हेड कॉन्स्टेबल क्रमांक १९९८ मिलिंद सोनार पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply