गणेशमूर्ती घ्या, पण चिखलातून वाट काढा! पाच पावली देवी मंदिर परिसराची दुरवस्था

अमळनेर (प्रतिनिधी) गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना शहरातील पाच पावली देवी मंदिरासमोरील परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याच परिसरातील शहर क्रमांक १ शाळेसमोर दरवर्षी गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल तसेच पूजासाहित्य, नारळ, मखर, विडा-पान, फुले आदींची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटली जातात. मात्र, परिसरातील दुरवस्थेमुळे यंदा दुकानदारांसह गणेशभक्तांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शहरात जवळपास ४० दिवसांनंतर दमदार पावसाचे आगमन झाल्याने पाच पावली देवी मंदिरासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व खड्डे निर्माण झाले आहेत. गणेशमूर्ती विक्रीसाठी स्टॉल उभारणाऱ्या व्यावसायिकांना जागा तयार करताना अडचणी येत असून, काही स्टॉलचे साहित्य व पाईपही पावसामुळे खराब झाले आहेत. त्यामुळे गणेशमूर्ती विक्रेत्यांची मोठी गैरसोय होत आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात या परिसरात मोठी गर्दी होत असते. गणेशमूर्ती खरेदीसाठी येणाऱ्या भाविकांना याच चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. रस्ता खड्डेमय असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. चिखलामुळे गणेशमूर्तींची विटंबना होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुकाने थाटली जाणार असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाला असतानाही वेळेत आवश्यक उपाययोजना करण्यात न आल्याने दुकानदार व नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी तातडीने चिखल हटवून खडी टाकावी, रस्ता समतल करावा आणि भाविकांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी दुकानदार व नागरिकांनी केली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *