औषध विक्रेत्यांचा उद्या बंद; अमळनेरात रॅली काढून तहसीलदारांना देणार निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी) अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी २० मे रोजी देशव्यापी बंदचे आवाहन केले असून, त्याला अमळनेर तालुका औषधी विक्रेता संघानेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अमळनेर शहरासह तालुक्यातील सर्व ठोक व किरकोळ औषध दुकाने बंद राहणार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, २० मे रोजी सकाळी १०.३० वाजता धुळे रोडवरील विजय मारुती मंदिर येथे सर्व औषध विक्रेते एकत्र येणार असून तेथून तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनाही निवेदन देण्यात आले असून, त्यांनी संघटनेच्या मागण्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांना पत्र पाठविल्याची माहिती संघटनेने दिली आहे. ऑनलाइन औषध विक्री बंद करणे, कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अव्यवसायिक सवलती थांबविणे तसेच बनावट औषधांच्या विक्रीला आळा घालणे या प्रमुख मागण्यांसाठी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्सने हा बंद पुकारला आहे. जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे व सचिव अनिल झंवर यांनीही या बंदला पाठिंबा दर्शविला आहे.

 

आपत्कालीन सेवा सुरू राहणार

 

या बंदमुळे नागरिकांनी अत्यावश्यक औषधे व वैद्यकीय साहित्याची आगाऊ व्यवस्था करून घ्यावी, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र, आपत्कालीन सेवा सुरू राहणार असून अत्यावश्यक गरज भासल्यास नागरिकांनी ९४२२२७८३३४, ८८३०९७५३३६ आणि ९४२०६५१९३१ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पाटील व सचिव प्रवीण माळी यांनी सांगितले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *