दोन वेगवेगळ्या दुचाकी अपघातांत दोघांचा मृत्यू; अमळनेर तालुक्यात हळहळ

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात दहिवद व करणखेडा शिवारात झालेल्या दोन वेगवेगळ्या दुचाकी अपघातांत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  पहिली घटना २ रोजी दहिवद गावाजवळ घडली. विटनेर (ता. चोपडा) येथील पंढरीनाथ विठ्ठल पाटील (वय ४८) हे त्यांच्या दुचाकीने टाकरखेडा येथे जात असताना दहिवद गावाच्या अलीकडे समोरून येणाऱ्या अज्ञात दुचाकी चालकाने भरधाव वेगाने धडक दिली. संबंधित दुचाकीचा क्रमांक एमएच १९ डिझेड १६४० असल्याचे समोर आले आहे. या अपघातात पंढरीनाथ पाटील यांच्या डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.

दरम्यान दुसरी घटना ८ रोजी सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास करणखेडा शिवारात घडली. करणखेडा येथील मुकेश बारकु पवार (वय ३५) हे त्यांच्या हिरो स्प्लेंडर दुचाकीने (क्रमांक एमएच १९ एएस ४०८३) मारवडहून करणखेडा येथे जात होते. दरम्यान रस्त्यात दुचाकीचा ताबा सुटल्याने ती रस्त्यालगत असलेल्या झाडावर जोरात आदळली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला.

घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ मदत करत त्यांना अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

तालुक्यात अल्पावधीतच घडलेल्या या दोन अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *