
अमळनेरात ‘श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ’ सोहळ्याला प्रारंभ
श्री पंच देवता मारोती मंदिरात १ जूनपर्यंत भागवत कथेचे आयोजन; वेळेत करण्यात आला बदल
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील मिल चाळ, स्टेशन रोड परिसरातील श्री पंच देवता मारोती मंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भक्तिमय वातावरणात ‘श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ समारोह’ तसेच ‘पुरुषोत्तम मास भागवत कथा’ चे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. २६ मे पासून सुरू झालेली ही कथा दि. १ जूनपर्यंत चालणार आहे.
सध्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता आयोजकांनी कथेच्या वेळेत बदल केला असून आता कथा दररोज सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत होणार आहे. या बदलामुळे भाविकांना सायंकाळच्या वेळेत अधिक सोयीस्करपणे कथा श्रवणाचा लाभ घेता येणार आहे. या धार्मिक सोहळ्यात कथाकार भागवताचार्य तथा ज्योतिषाचार्य हर्षलजी कुलकर्णी आपल्या अमृतमय वाणीमधून श्रीमद भागवत कथाचे निरूपण करीत आहेत. त्यांच्या प्रभावी कथनशैलीमुळे भाविकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून दररोज मोठ्या संख्येने भक्त उपस्थित राहत आहेत.
कथा दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अधिक जेष्ठ शुद्ध १४, शनिवार दि. ३० मे रोजी कृष्णजन्म उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. तसेच सोमवार दि. १ जून रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत कथा सांगता होणार आहे. धर्मशाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज व्यायाम शाळा, मिल चाळ, अमळनेर यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी सहकुटुंब, सहपरिवार व इष्टमित्रांसह उपस्थित राहून कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री पंच देवता मारोती मंदिर, मिल चाळ, स्टेशन रोड परिसरातील आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply