
मधाच्या पोळ्यासाठी जीव धोक्यात; १९ वर्षीय तरुणाचा मधमाशांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील लोंढवे येथे शेतातील मधमाश्यांचे पोळे झेलायला गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना २० रोजी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल कैलास पाटील (वय १९) हा सायंकाळी धुळेते अमळनेर रस्त्यालगत असलेल्या आपल्या शेतात मधमाश्यांचे पोळे झेलण्यासाठी गेला होता. मधमाशा चावू नयेत म्हणून त्याने प्लास्टिकची पिशवी डोक्यावरून घालून तोंडाभोवती घट्ट गाठ मारली होती. त्यानंतर त्याने मध झेलण्यास सुरुवात केली.
मात्र मधमाशा चवताळल्याने त्यांनी राहुलवर अचानक हल्ला चढवला. मधमाशांनी जोरजोरात दंश करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या अवस्थेत राहुल पळू लागला. तोंडावर मधमाशा येऊ नयेत म्हणून त्याने पिशवी घट्ट पकडून ठेवली. पळता पळता तो खाली पडला आणि त्याची प्रकृती गंभीर झाली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने डॉ. अनिल शिंदे यांच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा रक्तदाब प्रचंड वाढल्याने प्रकृती अधिकच गंभीर बनली. पुढील उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. तरुण वयात झालेल्या राहुलच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती त्याच्या चुलत भावाने अमळनेर पोलीस स्टेशन येथे दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील करीत आहेत.

Leave a Reply