सात वर्षांनंतर प्रभाग आठमध्ये सुरळीत पाणीपुरवठा; नागरिकांत समाधान

नगरसेविका अपूर्वा चौधरी व नगरसेवक सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रभाग क्रमांक ८ मधील एसटी कॉलनी, सुंदर नगर, पार्वती नगर, बँक कॉलनी आदी भागांमध्ये तब्बल सात वर्षांनंतर सुरळीत व योग्य प्रमाणात पाणीपुरवठा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नगरसेविका अपूर्वा चौधरी आणि नगरसेवक सचिन बळवंत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून ही समस्या मार्गी लावल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.

शहरातील पिंपळे रोडवरील शहराच्या बाहेरील टोकाला असलेल्या या वस्त्यांमध्ये गेल्या सात वर्षांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. नागरिकांना दोन-दोन तास मोटारी चालवूनही पाणी मिळत नव्हते. त्यात उन्हाळ्यात आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. वाढते तापमान आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे महिलांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. अनेकदा तक्रारी करूनही पालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये होती.

अखेरीस परिसरातील महिलांनी नगरसेवक सचिन बळवंत पाटील, नगरसेविका अपूर्वा चौधरी तसेच जालंदर चौधरी यांच्याकडे समस्या मांडली. त्यानंतर संबंधितांनी नगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करत पाईपलाईनमध्ये तांत्रिक दोष असल्यास नवीन २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला जोडणी करून पाणीपुरवठा सुरू करण्याचा पर्याय सुचवला.

नगरसेविका अपूर्वा चौधरी व नगरसेवक सचिन पाटील यांनी पुढाकार घेत संबंधित काम पूर्ण करून घेतले. त्यानंतर चाचणी घेण्यात आली असता अखेरच्या घरापर्यंत मुबलक पाणी पोहोचल्याचे स्पष्ट झाले. सात वर्षांनंतर परिसरात नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणी मिळू लागल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या कामासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, मुख्याधिकारी गणेश शिंदे, अभियंता सत्येम पाटील, प्रविणकुमार बैसाणे आदींचे सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *