अमळनेरात शाळा, महाविद्यालये व सामाजिक संस्थांमध्ये योगाभ्यासातून निरोगी जीवनाचा संदेश

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिक सादर करत सदृढ आरोग्य, मानसिक संतुलन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.

 

पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान न्यास

 

पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान न्यास, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने बाराव्या आंतरराष्ट्रीय योग महोत्सवानिमित्त शहरातील विविध ठिकाणी योग दिन साजरा करण्यात आला. भारत स्वाभिमान तालुका प्रभारी गजानन माळी यांनी योगाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक महत्त्व विशद करत प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे आवाहन केले. या वेळी स्वामी विवेकानंद शाळेचे प्राचार्य विनोद अमृतकर, पी. व्ही. ए. इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक देवरे सर, क्रीडा शिक्षक महेश माळी, डी. आर. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा सूर्यवंशी, क्रीडा संयोजक वाघ सर तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यापीठ, अमळनेर शाखेच्या प्रमुख दीदी उपस्थित होत्या. उपस्थितांनी नियमित योग करण्याचा संकल्प करत “करू योग – राहू निरोग” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय

 

धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयातही जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शांतीनिकेतन प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. निवेदिता कापडणेकर यांनी विविध योगासने सादर करून योगाचे आरोग्यदायी फायदे, एकाग्रता वाढविण्यातील महत्त्व आणि तणावमुक्त जीवनासाठीची उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शांतीनिकेतन प्राथमिक विद्यालय, जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक तसेच धनदाई महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शैलेश पाटील यांनी केले.

 

प्रताप हायस्कूल

 

प्रताप हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने योग दिन साजरा करण्यात आला. अमळनेर पतंजली योग समितीच्या योग शिक्षिका ज्योती माळी व भावना महाजन यांनी विद्यार्थ्यांकडून प्राणायाम, विविध योगासने आणि सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिक करून घेतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. बाविस्कर होत्या. शिक्षक प्रतिनिधी दिनेश पालवे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सुहास खांजोडकर, के. जी. कोळी, सचिन अहिरे, एन. आर. पाटील, सागर पवार, जयश्री पाटील, नम्रता दोरकर, ज्येष्ठ शिक्षक लक्ष्मण पाटील व विद्या पटेल उपस्थित होते.

 

पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूल

 

पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक योग दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी भुजंगासन, ताडासन, वज्रासन, शवासन, सूर्यनमस्कार, मयूरासन आदी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. योगाचार्य व क्रीडा शिक्षक महेश माळी यांनी योगाचे शारीरिक व मानसिक फायदे स्पष्ट केले. पतंजली संस्था हरिद्वारचे योगाचार्य रामदेवजी बाबा यांचे परमशिष्य गजानन माळी यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमासाठी चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, रोहन मुंदडा, व्ही. पी. बडावे, प्रशांत वंजारी, अशोक महाजन, सविता सोनवणे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

 

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल

 

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्येही आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. “योगा ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी असून शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगसाधना ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन योगशिक्षक गजानन माळी यांनी केले. शाळेच्या संचालिका व अध्यक्षा सीतीका अग्रवाल आणि विनोद अमृतकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध योगासने व प्राणायाम सादर केले. शाळेच्या अध्यक्षा सीतीका अग्रवाल आणि विनोद अमृतकर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी केलेले प्रभावी सूत्रसंचालन ठरले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *