
धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) : सकल धनगर समाज, अमळनेर यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार उमा ढेकळे यांच्या मार्फत पाठविण्यात आले. उत्तर महाराष्ट्र ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, दिल्लीचे अध्यक्ष बन्सीलाल भागवत यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने सर्वोच्च न्यायालयात पूर्ण ताकदीने बाजू मांडावी, सर्व कायदेशीर व घटनात्मक बाबी स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र दाखल करावे तसेच या प्रकरणासाठी अनुभवी वकिलाची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संत बाळूमामा देवस्थानसाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा, देवस्थानच्या विश्वस्त मंडळात २१ सदस्य असावेत आणि अध्यक्षपद धनगर समाजातील व्यक्तीला देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकला स्वातंत्र्यवीर शिंग्रोबा यांचे नाव देण्यात यावे, तसेच चर्चगेट रेल्वे स्थानकाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने करण्यात यावे, या मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या.
या वेळी नितीन निळे, मच्छिंद्र लांडगे, एस. सी. तेले, हरचंद लांडगे, रमेश शिरसाठ, दिलीप खांडेकर, चंद्रकांत कंखरे, प्रदीप कंखरे, चेतन देवरे, विलास कंखरे, शरद धनगर कवी, अनिल धनगर, सौरव भागवत, भाऊलाल पाटील, निखिल धनगर, अर्जुन भागवत, संदीप पाटील, देविदास पाटील आणि संदीप धनगर उपस्थित होते.

Leave a Reply