पाऊस कागदावर समाधानकारक; शेतात मात्र खरीप पिके संकटात! काँग्रेसची सरसकट हेक्टरी मदतीची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यात यंदा पावसाचे असमान वितरण झाल्याने खरीप पिकांची स्थिती गंभीर झाली असून, पावसाच्या खंडामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी अनुदान अथवा आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदन देताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी यांनी तालुक्यातील पाऊस, पिकांची स्थिती, पीकविमा आणि शेती उत्पादनाची सद्यस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. यंदा मान्सून उशिरा आल्याने खरीप पेरण्या उशिरा झाल्या. त्यानंतर पावसाने मोठी ओढ दिल्याने जेमतेम तग धरून असलेली खरीप पिके आता धोक्यात आली आहेत. हवामान विभागाचा आगामी पावसाचा अंदाजही फारसा आशादायक नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांची पिके काही प्रमाणात तग धरून आहेत. मात्र, अशा शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे पावसावर अवलंबून असलेली कोरडवाहू पिके पूर्णतः संकटात आली आहेत. तालुक्यात १० ते १२ फूट उंच वाढणारा मका केवळ ५ ते ६ फूट वाढला असून, वितभर लांबीचे कणीस लागले आहे. त्या कणसात दाणे पूर्ण भरतील की नाही, याबाबतही शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. मुगाच्या पिकालाही पावसाच्या खंडाचा फटका बसला आहे.

अमळनेरच्या पश्चिम भागात बाजरीचे उत्पादन जेमतेम येण्याची शक्यता आहे. उत्तर-पूर्व भागात तापी नदीमुळे सिंचन व्यवस्था तुलनेने चांगली असली तरी कपाशीवर बोंडअळी व लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात ७० ते ८० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ज्वारी आणि सोयाबीन पिकांची स्थितीही चिंताजनक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्षा सौ. सुलोचना वाघ, मनोज पाटील, प्रा. श्याम पवार, रामकृष्ण पाटील, शरद पाटील, डॉ. प्रकाश सोनवणे, कन्हैयालाल कापडे, रोहिदास कापडे, दिलीप पाटील, पी. वाय. पाटील, बन्सीलाल भागवत, शालिग्राम पाटील, राजेंद्र चौधरी सर, हर्षल जाधव, धोंडू महाजन, भगवान संधान शिव, सुभाष शिंदे, सुधाकर भैसे, पितांबर पाटील, गजेंद्र साळुंखे, राजेंद्र भाट, डॉ. रवींद्र पाटील, भिकाजी पाटील आणि अशोक पाटील उपस्थित होते.

 

पीकविम्याच्या निकषावरही काँग्रेसची नाराजी

 

पावसाच्या खंडामुळे २५ टक्के पीकविमा अग्रीम भरपाई मिळण्याची शक्यता होती. मात्र, पीकविमा कंपनीने पावसाच्या खंडाचा निकष काढून त्याऐवजी पिकाच्या उत्पन्नावर आधारित निकष ठेवला आहे. यंदा फारच कमी शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असून, बँका, विमा काढण्याचे संकेतस्थळ आणि पीकविम्याच्या निकषांमधील बदल यांसह अनेक बाबी त्यासाठी कारणीभूत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

३१ ऑगस्ट २०२६ पर्यंतच्या पावसाच्या आकडेवारीनुसार अमळनेर, शिरूड, पातोंडा, मारवड, नगा‌व आणि अमळगाव मंडळात प्रत्यक्ष पावसाचे प्रमाण ७० ते ८९.३० टक्के आहे. तर भरवस व वावडे मंडळात अनुक्रमे १३०.२० आणि ११७.४० टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यात पावसाचे वितरण असमान राहिल्याने एकूण पावसाची आकडेवारी काहीशी समाधानकारक दिसत असली तरी त्याचा पिकांना अपेक्षित फायदा झालेला नाही. तालुक्यात सरासरी ४७४.३० मिलिमीटर पाऊस झाला असला तरी लहान बंधारे आणि तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे आगामी काळात गावोगावी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. खरीप हंगामासाठी खते, बियाणे, कीटकनाशके आणि शेती मशागतीवर शेतकऱ्यांचा पैसा खर्च झाला असून, आता रब्बी हंगामासाठीही मोठा खर्च करावा लागणार आहे. त्यातच महागाई वाढल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट अधिक तीव्र झाले आहे.

 

वावराच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करा’

 

केवळ पावसाची आकडेवारी न पाहता त्या पावसाचा पिकांना किती फायदा झाला, उत्पादनावर काय परिणाम झाला आणि पाऊस जमिनीत किती मुरला, याचा प्रत्यक्ष विचार होणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी वावराच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा अंदाज घ्यावा. प्रत्यक्ष पाहणीतूनच शेतीची खरी परिस्थिती स्पष्ट होईल. त्या आधारे शासनाने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस कमिटीने केली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *