
गांधलीतील नाला खोलीकरणामुळे भूजल पातळीत सात मीटर वाढ; अमळनेर तालुक्यात मात्र टँकर संकट गडद
अमळनेर (प्रतिनिधी) : एकीकडे अमळनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये भूजल पातळी खालावत चालली असून टँकर व विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव वाढत आहेत, तर दुसरीकडे गांधली गावात करण्यात आलेल्या नाला खोलीकरणामुळे भूजल पातळीत तब्बल सात मीटरने वाढ झाल्याचे सकारात्मक चित्र समोर आले आहे.
तालुक्यातील गांधली येथे विप्रो कंपनीच्या सीएसआर फंडातून तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर नाला खोलीकरणाचे काम करण्यात आले. या उपक्रमामुळे गांधलीसह परिसरातील पिळोदा, धुपी आदी सुमारे पाच किलोमीटर परिसरातील विहिरी व जलस्रोतांना मोठा लाभ झाला आहे. गावातील विहिरींची पाणी पातळी सात मीटरने वाढल्याचे सांगण्यात आले.
मात्र दुसरीकडे तालुक्यातील गडखांब, मांजर्डी, धुपी, दहिवद खुर्द, जुनोने, भोरटेक, पळासदळे, पाडसे, एकरुखी, मेहेरगाव, रामेश्वर बुद्रुक आदी गावांसाठी ११ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तसेच उदयनगर, जानवे, तरवाडे या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या गावांसाठी अमळनेर, तासखेडा व धावडे येथील विहिरी टँकर भरण्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. आता मंगरूळ व गलवाडे बुद्रुक या गावांसाठीही टँकर प्रस्ताव आले असून खोकरपाट व बिलखेडा गावांच्या विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले आहेत.
दरम्यान, धावडे येथून टँकर भरून दूरवर पाणीपुरवठा करावा लागत असल्याने वेळ, इंधन व आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गांधली परिसरात भूजल पातळी वाढल्याने येथील पाण्याचा उपयोग टँकर भरण्यासाठी केल्यास इंधन व शासनाच्या निधीची बचत होऊ शकते, असा विचार पुढे आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी गांधली येथून टँकर भरण्यासाठी सरपंच नरेंद्र पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते.
तालुक्यातील सुमारे १७ गावांच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेल्या असल्या तरी वीज जोडणीअभावी त्या सुरू होऊ शकलेल्या नाहीत. परिणामी काही गावांमध्ये टँकर सुरू करण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठेकेदारांकडून नवीन आदेश व थकीत बिलांच्या मागण्या होत असल्याने कामे रखडल्याचे सांगितले जात आहे.
चौबारी गावातही विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव आला होता. मात्र तेथील पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर तुटलेली पाइपलाइन दुरुस्त करण्यात आली आणि पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाल्याने विहीर अधिग्रहणाची गरज टळली.
तालुक्यातील वाढते पाणी संकट आणि त्यावर काही गावांमध्ये यशस्वी ठरत असलेले जलसंधारणाचे प्रयोग यामुळे प्रशासनासमोर दीर्घकालीन उपाययोजनांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Leave a Reply