
घरकुलाच्या वादातून पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण; आई-मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर पोलिसांत तक्रार; शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील तांबेपुरा भागातील घरकुलाच्या वादातून आई आणि मुलाने नगरपालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तांबेपुरा भागातील उज्वला लोटन पाटील यांचे घरकुल मंजूर झाले असून त्यांना पालिकेकडून एक लाख रुपयांचे अनुदानही मिळाले होते. मात्र शेजारील प्लॉटधारकाशी सीमांकनाचा वाद निर्माण झाल्याने घरकुलाचे काम रखडले होते. तरीदेखील पुढील अनुदान मिळावे यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता.
दरम्यान, १९ मे रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास उज्वला पाटील व त्यांचा मुलगा निलेश पाटील यांनी पालिकेत जाऊन कर्मचारी धीरज पाटील, अविनाश संदानशिव आणि राधेश्याम अग्रवाल यांना शिवीगाळ केली. तसेच फरशी मारण्याचा प्रयत्न करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी पोलिस निरीक्षकांना पत्र दिले. कर्मचारी राधेश्याम अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.

Leave a Reply