
उन्हाची तीव्रता वाढली; अमळनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये ‘उष्माघात कक्ष’ सज्ज, २४ तास उपचार सुविधा उपलब्ध
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांच्या पुढे जात असल्याने नागरिकांना उष्णतेचा मोठा फटका बसत आहे. संभाव्य उष्माघाताच्या घटनांना तोंड देण्यासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने विशेष खबरदारी घेत स्वतंत्र ‘उष्माघात कक्ष’ सुरू केला असून, आवश्यक सर्व सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
याबाबत माहिती देताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश किसन ताळे यांनी सांगितले की, वाढत्या उष्णतेमुळे चक्कर येणे, उलट्या, ताप, डिहायड्रेशन यांसारख्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. अशा रुग्णांना तात्काळ आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या ‘उष्माघात कक्षात’ रुग्णांसाठी शीतखोली, कुलर तसेच थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शरीराचे तापमान तपासण्यासाठी आधुनिक तापमान मापक उपलब्ध असून, तातडीच्या उपचारासाठी आवश्यक औषधे, ओआरएस पावडर आणि सलाईनचा पुरेसा साठा ठेवण्यात आला आहे. याशिवाय आइस पॅक व कोल्ड स्पंजिंगची सुविधा उपलब्ध असून, २४ तास तज्ज्ञ डॉक्टर आणि परिचारिकांच्या देखरेखीखाली रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळावे
दरम्यान, डॉ. ताळे यांनी नागरिकांना उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळावे, बाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ वापरावा, तसेच भरपूर पाणी, ताक, लिंबू सरबत यांसारखे द्रवपदार्थ सेवन करावे. उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास विलंब न करता तात्काळ रुग्णालयात संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने घेतलेली ही सज्जता नागरिकांसाठी दिलासादायक ठरत असून, योग्य काळजी घेतल्यास उष्माघाताचा धोका टाळता येऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply