महापुराने ‘ ‘खबरीलाल न्यूज’ आणि अमळनेर ७ न्यूज’ च्या कार्यालयात लाखोंचे नुकसान

अमळनेर (प्रतिनिधी)  ३० व ३१ जुलैच्या मध्यरात्री अमळनेर शहरावर कोसळलेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने शहरात अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली. अनेक घरांमध्ये व व्यावसायिक आस्थापनांमध्ये पुराचे पाणी शिरून मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीचा फटका निष्पक्ष व रोकठोक पत्रकारितेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘अमळनेर ७ न्यूज’ आणि ‘खबरीलाल न्यूज’ यांच्या संयुक्त कार्यालयालाही बसला. पुराच्या पाण्यामुळे कार्यालयातील अत्यावश्यक तांत्रिक साहित्य, फर्निचर आणि महत्त्वाची कागदपत्रे खराब होऊन सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कार्यालयात अचानक शिरलेल्या पाण्यामुळे बातम्यांचे संकलन आणि प्रसारणासाठी वापरण्यात येणारे दोन लॅपटॉप, एक संगणक, रेकॉर्डिंग मायक्रोफोन, प्रिंटर, विविध सॉफ्टवेअर्स तसेच इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य पूर्णपणे पाण्याखाली गेले. कार्यालयातील फर्निचर आणि महत्त्वाची कागदपत्रेही खराब झाली. त्यामुळे कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या नुकसानीमुळे  ‘अमळनेर ७ न्यूज’चे बातम्यांचे प्रसारण तात्पुरते बंद ठेवावे लागले आहे. त्यामुळे दररोज स्थानिक घडामोडींची माहिती घेणाऱ्या हजारो वाचक व प्रेक्षकांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘अमळनेर ७ न्यूज’चे संपादक महेंद्र रामोशे यांनी प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करत सांगितले की, “अचानक आलेल्या या आपत्तीमुळे बातम्यांचे प्रसारण थांबले असून यामुळे प्रेक्षकांची होत असलेली गैरसोय आम्हालाही वेदनादायी आहे. कार्यालयाची दुरुस्ती आणि तांत्रिक साहित्याची उभारणी युद्धपातळीवर सुरू आहे. नुकसान मोठे असले तरी ‘अमळनेर ७ न्यूज’ लवकरच नव्या उमेदीने आणि अधिक जोमाने पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”दरम्यान, हे मोठे नुकसान केवळ ढगफुटीसदृश पावसामुळे झाले की शहरातील नियमबाह्य बांधकामांमुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा रोखला गेल्याने ही परिस्थिती निर्माण झाली, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेतला जाईल, असा इशाराही संपादक महेंद्र रामोशे यांनी दिला.

संकट कितीही मोठे असले तरी त्यावर मात करण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी कवीश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या ‘कणा’ कवितेतील भावनेचा उल्लेख करत, “मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा… पाठीवरती हात ठेवून, फक्त लढ म्हणा!” या ओळींप्रमाणे संकटाशी खंबीरपणे दोन हात करत पुन्हा उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *