जय योगेश्वर ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. अनिल पाटील यांचा अपघाती मृत्यू; शिक्षण क्षेत्रावर शोककळा

अमळनेर (प्रतिनिधी) येथील जय योगेश्वर ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. अनिल दयाराम पाटील यांचा मोटारसायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १३) दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास ढेकू रोडवर, पोलीस स्टेशनजवळ घडली. त्यांच्या आकस्मिक निधनाने शिक्षण क्षेत्रासह अमळनेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्रा. अनिल पाटील हे एमएच-१९ बीएक्स-९५१३ क्रमांकाच्या मोटारसायकलने आपल्या मूळ गावी तरवाडे येथे गेले होते. तेथून परत येत असताना ढेकू रोडवर ते रस्त्याच्या कडेला गंभीर अवस्थेत पडलेले आढळून आले. घटनास्थळावरील परिस्थितीवरून अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.

प्रा. अनिल पाटील हे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू, शांत आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे सहकारी शिक्षक, विद्यार्थी आणि मित्रपरिवारामध्ये शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, गेल्याच महिन्यात त्यांच्या धाकट्या बंधू दीपक पाटील यांचे आकस्मिक निधन झाले होते. त्या दुःखातून कुटुंब सावरत असतानाच आता प्रा. अनिल पाटील यांच्या निधनाने पाटील कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. सुनिल दयाराम पाटील व प्रवीण दयाराम पाटील यांचे ते ज्येष्ठ बंधू होते. प्रा. अनिल पाटील यांच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा अमळनेर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *