
मुसळधार पावसाने अमळनेरला दिलासा; शहापूर येथे वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात मंगळवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी शहापूर येथे वीज कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचून नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
जून महिन्याचे २२ दिवस उलटूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतेत होते. अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या होत्या; मात्र पावसाअभावी अंकुर फुटण्यास अडचणी निर्माण होत होत्या. २३ जून रोजी दुपारी झालेल्या पावसामुळे पिकांना आवश्यक ओलावा मिळण्याची आशा निर्माण झाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जोशीपुरा भागात पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले. स्वामीनारायण मंदिर परिसरातही रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. तांबेपुरा-सानेनगर मार्गावरील विप्रो बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. रस्त्यालगतच्या नाल्यातील कचरा वाहून रस्त्यावर आला, तर सांडपाणीही बोगद्यात साचल्याचे दिसून आले.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रेल्वे प्रशासनाने नाल्याच्या काठावर संरक्षक भिंत बांधल्याने पावसाचे पाणी पूर्वीप्रमाणे पसरत नसून ते थेट बोगद्यात साचते. त्यामुळे तांबेपुरा, सानेनगर, नांदगाव, अंतुर्ली, रंजाणे, खापरखेडा, अंबारे, तासखेडा, आमोदे व लडगाव या गावांकडे जाणाऱ्या नागरिकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात त्रास सहन करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तहसील कार्यालय परिसरातही दुय्यम निबंधक कार्यालयासमोर पाणी साचल्याने खरेदी-विक्री व्यवहारासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली.
वीज कोसळून कुटुंबाचा आधारवड गेला

शहापूर येथे शेतात काम करत असताना राकेश रातीलाल पाटील (वय ३४) यांचा वीज कोसळून मृत्यू झाला. पाऊस सुरू झाल्यानंतर त्यांची मोटारसायकल चिखलात अडकल्याने त्यांनी ती शेताबाहेर रस्त्यावर आणली आणि निंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला. त्यांची आई शेतातच थांबली होती. दरम्यान, रस्त्यालगतच्या निंबाच्या झाडावर वीज कोसळल्याने राकेश पाटील गंभीर भाजले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने त्यांची आई या दुर्घटनेत बचावली. राकेश पाटील हे कुटुंबातील कर्ते सदस्य होते. त्यांच्या वडिलांना पक्षाघाताचा झटका आल्याने ते दिव्यांग आहेत. कुटुंबाचा आधारवड असलेल्या राकेश यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन बहिणी असा परिवार असून शहापूर परिसरात त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply