
मांडळ येथील सागर कोळी जळगाव-धुळे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडळ येथील सागर अशोक कोळी याला उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अंतर्गत दोन वर्षांसाठी जळगाव व धुळे जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सागर अशोक कोळी याच्याविरुद्ध वाळू चोरी, शस्त्र कायदा तसेच दंगल यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असून ते न्यायप्रविष्ट आहेत. तो साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्याने तसेच त्याच्यामुळे सामाजिक जीवन, कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मारवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावावर सुनावणी घेऊन तसेच गोपनीय साक्षीदारांची पडताळणी केल्यानंतर उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ५६ (अ) व (ब) अन्वये सागर अशोक कोळी याला जळगाव व धुळे जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले. हद्दपारीच्या कालावधीत राज्यातील इतर ठिकाणी वास्तव्यास असल्यास संबंधित नजीकच्या पोलीस ठाण्यात महिन्यातून एकदा आपला राहण्याचा पत्ता व इतर आवश्यक माहिती देणे बंधनकारक राहणार आहे. तसेच राज्याबाहेर जाणार असल्यास दहा दिवसांच्या आत संबंधित पोलीस ठाण्याला त्याची माहिती देण्याचे निर्देशही आदेशात नमूद करण्यात आले आहेत.

Leave a Reply