भूमिपूजन झाले, आश्वासन गेले; दीड कोटींचे अभ्यास केंद्र अजूनही कागदावरच!

अमळनेर (प्रतिनिधी) : गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हक्काचे व सुसज्ज अभ्यास केंद्र मिळावे, या उद्देशाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने अमळनेर येथील टाकरखेडा रोडवर अभ्यास केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल १ कोटी ४८ लाख ६९ हजार ४४१ रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या या कामासाठी मार्च २०२४ मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. विद्यापीठाने ३ एप्रिल २०२४ रोजी संबंधित ठेकेदाराला काम देण्याबाबतचे आशयपत्र दिले. आज रोजी या आशयपत्राला २ वर्षे ४ महिने २६ दिवस झाले आहेत.

या निविदेतील कामाची मुदत ३६५ दिवसांची असतानाही प्रत्यक्ष बांधकामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, ५ ऑगस्ट २०२४ रोजी तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते अभ्यास केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन झाले होते. विद्यापीठाच्या अधिकृत वार्षिक अहवालातही या भूमिपूजनाची नोंद आहे. भूमिपूजनाला आता दोन वर्षे पूर्ण होत आली, मात्र विद्यार्थ्यांना अभ्यास केंद्राची सुविधा मिळालेली नाही. भूमिपूजनावेळी आठ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भूमिपूजन झाले, आश्वासने झाली, कागदपत्रे झाली; मग प्रत्यक्ष इमारत कधी उभी राहणार? असा संतप्त सवाल विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणातील आणखी गंभीर बाब म्हणजे जागेची दोन वेळा शासकीय मोजणी होऊनही प्रश्न सुटलेला नाही. सुरुवातीला दोन एकर जागेची मोजणी करण्यात आली. त्यानंतर जागा उंच-सखल असल्याचे व अभ्यास केंद्रासाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता असल्याचे कारण पुढे आले. विद्यापीठाने अतिरिक्त जागेची मागणी करून पुन्हा शासकीय मोजणी केली. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन, महसूल यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप होत आहे. एकीकडे ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या घोषणा केल्या जातात; तर दुसरीकडे दीड कोटींचा प्रकल्प दोन वर्षांपासून प्रत्यक्षात येत नसल्याने विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत झाला आहे. मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करून आशा निर्माण करायची आणि त्यानंतर दोन वर्षे विद्यार्थ्यांना प्रतीक्षेत ठेवायचे, हा प्रकार गंभीर असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करून विलंबास नेमके कोण जबाबदार आहे, हे निश्चित करावे, अशी मागणी होत आहे. संबंधित ठेकेदारासोबतच विद्यापीठ प्रशासनातील जबाबदार अधिकारी आणि बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचीही भूमिका तपासून, निष्काळजीपणा किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. तसेच ठेकेदाराकडून करारातील अटींचा भंग झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया राबवावी. विद्यमान निविदा व्यवहार्य राहिलेली नसेल किंवा कराराच्या अटींचे उल्लंघन झाले असेल, तर सदर निविदा रद्द करून नव्याने पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवावी आणि अभ्यास केंद्राचे बांधकाम तातडीने सुरू करावे, अशी जोरदार मागणी होत आहे. दीड कोटींचा निधी, निविदा प्रक्रिया, ठेकेदाराची निवड, आशयपत्र आणि मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन सगळे झाले; मग इमारत मात्र कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर आता विद्यापीठ प्रशासन, संबंधित मंत्री व लोकप्रतिनिधींनी अमळनेरच्या विद्यार्थ्यांना द्यावे. कागदावरील आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करून विद्यार्थ्यांना अभ्यास केंद्र उपलब्ध करून देणे, हीच आता खरी गरज आहे.

 

बांधकाम सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण

 

“अमळनेर येथील विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित अभ्यास केंद्राच्या इमारतीचे बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र नगरपरिषदेकडून प्राप्त झाले असून, वीज कनेक्शनची कार्यवाहीही पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता बांधकाम सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी या केंद्रात आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. त्यामुळे बांधकामाला तातडीने सुरुवात करून हे अभ्यास केंद्र लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येईल. अमळनेर व परिसरातील विद्यार्थ्यांना याचा निश्चितच मोठा शैक्षणिक लाभ होईल.”

— प्रदीप पवार, कार्यकारी अभियंता, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *