
अमळनेरची सुकन्या दियाना उर्फ अमृता पाटीलची वर्ल्डकपमध्ये निवड
अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेरच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. येथील सुप्रसिद्ध उद्योजक आर. के. पटेल परिवारातील सुकन्या दियाना उर्फ अमृता मितेश पाटील हिची अंडर-१५ इंडोअर क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून भारतीय संघात निवड झालेली अमृता ही एकमेव खेळाडू ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेत २१ सप्टेंबरपासून वर्ल्डकप स्पर्धा रंगणार असून, या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अमृता भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
दियाना उर्फ अमृता ही अमळनेर येथील मुंदडा ग्लोबल स्कूलची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आहे. ती स्वर्गीय उद्योजक आर. के. दादा पाटील यांची पणती, उद्योजक विनोदभैय्या पाटील व वसंत बापू पाटील यांची नात आणि मितेश पाटील व मोनाली मितेश पाटील यांची कन्या आहे. गेल्या तीन वर्षांपासून अमृता सातत्याने क्रिकेट खेळत असून, नियमित सराव आणि मेहनतीच्या जोरावर तिने उत्तम खेळाडू म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जळगाव येथे राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत राज्यभरातील अंडर-१५ क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अमृताने विकेटकीपिंग आणि फलंदाजीत उत्कृष्ट खेळी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. तिच्या या कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या अंडर-१५ इंडोअर क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात तिची निवड झाली.
विशेष म्हणजे, महाराष्ट्र राज्यातून भारतीय संघात निवड झालेली अमृता ही एकमेव खेळाडू आहे. त्यामुळे तिच्या या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, अमळनेरच्या क्रीडा क्षेत्रातून आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेणाऱ्या या युवा खेळाडूचे सर्वत्र कौतुक होत आहे. याआधी धुळे येथे झालेल्या अंडर-१९ बॉईज क्रिकेट सिरीजमध्येही अमृताने धमाकेदार प्रदर्शन करत मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान मिळविला होता. याशिवाय विविध क्रिकेट स्पर्धांमध्येही तिने चमकदार कामगिरी केली आहे. क्रिकेटमधील तिच्या वाटचालीसाठी प्रशिक्षक मिलिंद शिंदे आणि रोनक शेख यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
वर्ल्डकपच्या तयारीसाठी अमृता १० सप्टेंबरपासून बंगळुरू येथे सरावासाठी जाणार आहे. त्यानंतर २१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी ती दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. अमृताच्या या निवडीबद्दल राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर येथे अमृताला शुभेच्छा देत तिचे कौतुक व सत्कार केला. खासदार स्मिताताई वाघ, माजी मंत्री तथा आमदार अनिलदादा भाईदास पाटील आणि मुंदडा ग्लोबल स्कूलचे चेअरमन ओमप्रकाश मुंदडा यांनीही दियाना उर्फ अमृता तसेच तिचे आई-वडील मितेश पाटील व मोनाली मितेश पाटील यांचे अभिनंदन केले आहे. अमृताच्या भारतीय संघातील निवडीमुळे अमळनेरच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढला असून, तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दक्षिण आफ्रिकेतील वर्ल्डकपमध्ये अमृता आपल्या उत्कृष्ट खेळाने भारताचे आणि अमळनेरचे नाव उंचावेल, अशा शुभेच्छा क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

Leave a Reply