जुनी पेन्शन लागू करा; अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्या’ २८ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

अमळनेर (प्रतिनिधी) १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील एक हजार शिक्षकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेल व पत्राद्वारे केली आहे.

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः किंवा विनाअनुदानित शाळेत नियुक्त झालेले आणि १ नोव्हेंबर २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेले कर्मचारी यांना जुनी पेन्शन नाकारण्यात आली आहे. मात्र १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षण सेवक, ज्यांची जाहिरात निघालेली होती, मुलाखती झालेल्या होत्या तसेच हंगामी काम केलेले होते; मात्र त्यांची नियुक्ती १ नोव्हेंबर २००५ नंतर झाली आहे, अशा कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन लागू करण्यात आली आहे. त्यामुळे १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांवर शासन अन्याय करत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा. सहानुभूतीपूर्वक व मानवतेच्या दृष्टीने सकारात्मक विचार करून १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेल व पत्राद्वारे करण्यात आली आहे.

या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे २६ हजार कर्मचाऱ्यांनी एकाचवेळी ई-मेल पाठविल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच २८ सप्टेंबरपासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या संदर्भात खासदार स्मिता वाघ यांनीदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री यांना पत्र पाठवून जुनी पेन्शन देण्याची मागणी केली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *