पीक कर्ज वाटपात जुनी पद्धत कायम; वारसदार शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्ज वाटपाच्या पद्धतीत करण्यात आलेल्या बदलामुळे निर्माण झालेला प्रश्न अखेर मार्गी लागला असून, संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यामुळे वारसदार शेतकऱ्यांना सामाईक कर्ज घेण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,चालू २०२६ आर्थिक वर्षात बँकेने प्रत्येक वारसदारास स्वतंत्र कर्ज वाटप करण्याच्या सूचना दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यापूर्वी सामाईक खात्यातील सर्व वारसदारांनी एका व्यक्तीस अधिकृत करून दिलेल्या संमतीपत्राच्या आधारे कर्ज व्यवहार सुरळीत सुरू होता. मात्र नव्या पद्धतीमुळे कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते प्रा. सुभाष पाटील यांनी दि. १८ एप्रिल रोजी बँकेचे चेअरमन यांना निवेदन सादर केले. त्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. चर्चेदरम्यान काही काळ वातावरण तापले होते; मात्र अखेरीस सर्व बाजूंचा विचार करून तोडगा काढण्यात आला. संचालक मंडळाने यापूर्वीप्रमाणेच संमतीपत्र धारक वारसदारांनाच कर्ज वाटप करण्याची पद्धत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात कर्ज वितरण पूर्ववत पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बैठकीस चेअरमन संजय पवार, माजी आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार सतीश पाटील, प्रताप हरी पाटील आदी उपस्थित होते. तसेच प्रा. सुभाष पाटील, दिनेश पवार, रोहिदास सुखा पाटील यांच्या स्वाक्षरीचे निवेदन सादर करण्यात आले होते.

 

बँकेसमोर ठाम भूमिका मांडली

 

“वारसदार शेतकऱ्यांना अडचण येऊ नये, यासाठी बँकेसमोर ठाम भूमिका मांडली. अखेर संचालक मंडळाने सकारात्मक निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.”

– प्रा. सुभाष पाटील

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *