डंपर खाली एक तरुण चिरडला गेल्याने संतप्त नागरिकांनी केले रास्ता रोको आंदोलन

लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षपणामुळे अतिक्रमणे झाल्याचा केला आरोप

 

अमळनेर (प्रतिनिधी) अतिक्रमनाने व्यापलेल्या धुळे ते चोपडा रस्त्यावर भरधाव मातीच्या डंपर खाली एक तरुण चिरडला गेल्याने संतप्त नागरिकांनी पैलाड भागातील शनीपेठ येथे रास्ता रोको आंदोलन करून संताप व्यक्त केला. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षपणामुळे अतिक्रमणे झाल्याने अनेक वेळा अपघात होत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १३ रोजी दुपारी पैलाड भागात शनीपेठमध्ये धुळे ते चोपडा रस्त्यावर मातीने भरलेल्या डंपर (क्रमांक एम.एच. ४८, ए.जी. ८३०७) खाली एक ताडेपुरा येथील तरुण जितेंद्र अरुण चव्हाण (वय ३०) हा तरुण चिरडला गेला. त्याच्या पोटाला गंभीर जखम झाली आहे. संतप्त नागरिकांनी घटनास्थळी रास्ता रोको केले. आर.के. नगरपासून तर पैलाड भागातील स्मशानभूमी आणि टाकरखेडा रस्ता पूर्णपणे अतिक्रमनांनी व्यापला आहे. त्यात हातगाड्या, दुकानांचे ग्राहक, मोटारसायकली रस्त्यावर वाहने लावतात, अवैध प्रवासी वाहने मुजोरी करतात. याकडे वाहतूक पोलिस दुर्लक्ष करतात. बोरी नदीच्या पुलावर तर बाजारपेठ सुरू झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पुलावर ग्राहक देखील उभे राहिल्याने वाहतुकीची कोंडी होते. परिणामी पैलाड चौफुलीवर गर्दी होते. तेथील दुकाने, टपऱ्या, प्लास्टिक ड्रम विक्रेते यांच्यामुळे रस्ता व्यापला जाऊन अखेरीस अपघात होतात. बसस्थानक जवळ देखील रिक्षा दिलेल्या जागा सोडून रस्त्यावर उभ्या राहतात, टॅक्सी रस्त्यावर उभ्या राहतात , कोणालाही वाटेल तेथे प्रवासी भरतात आणि उतरवतात. सीसीटीव्ही कॅमेरे असुनही पोलिसांकडून कारवाई होत नाही. अनेकदा एसटी बस आगारात जातांना किंवा येताना अडचण येते. रस्त्यालगत दुकाने आणि हॉटेल्स यांनी दुकाने शेड वाढवून घेतली आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपरिषद, पोलीस प्रशासन आणि तालुक्याचे पालक म्हणून महसूल विभाग यांनी कोणाचीही भाडभिड न ठेवता लोकप्रतिनिधी राजकीय व्यक्तींच्या दबावाखाली न येता सामान्य जनतेचे हित विचारात घेऊन अतिक्रमण वॉश आऊट मोहीम राबवावी, अशी मागणी सामान्य जनतेकडून होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *