‘गो-सन्मान आवाहन अभियान’ला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मंगळग्रह सेवा संस्थेच्या उपक्रमातून गो-संवर्धनाचा जागर

अमळनेर (प्रतिनिधी) मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘गो-सन्मान आवाहन अभियान’चे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात झाले. मंगळग्रह मंदिर परिसरात आयोजित या अभियानाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून गो-संवर्धन आणि गो-सन्मानाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीशजी कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी तसेच अभियानाच्या समन्वयक सौ. मीना शहा उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी गोमातेचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व अधोरेखित करत समाजातील प्रत्येक घटकाने गो-संरक्षणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी स्वखुशीने अभियानाला पाठिंबा दर्शवत आपली नोंदणी व स्वाक्षऱ्या केल्या. दिवसभर मंदिर परिसरात भाविकांचा उत्साह आणि सहभाग पाहायला मिळाला. या अभियानाच्या माध्यमातून गोमातेच्या संरक्षण, संवर्धन आणि सन्मानासाठी व्यापक जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. “गोमाता ही भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. तिच्या सन्मानासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे,” असा संदेश यावेळी मान्यवरांनी दिला. दरम्यान, या अभियानामुळे गो-संवर्धनाच्या विषयाला सामाजिक पातळीवर नवी दिशा मिळेल, असा विश्वासही उपस्थितांनी व्यक्त केला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *