सत्यनिष्ठ लेखणीचा गौरव : रवींद्र मोरे यांना राज्यस्तरीय ‘ज्ञानवंत पत्रकार पुरस्कार’ जाहीर

अमळनेर (प्रतिनिधी) पत्रकारितेतील निष्ठा, सामाजिक भान आणि जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली बांधिलकी यांची दखल घेत ‘महादर्पण’चे मुख्य संपादक रवींद्र मोरे यांना राज्यस्तरीय ‘ज्ञानवंत पत्रकार पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ‘सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षीस वितरण सोहळा २०२६’ या प्रतिष्ठित कार्यक्रमात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

हा सोहळा जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून माजी डायट प्राचार्य निलकंठ गायकवाड उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी जळगावचे आमदार सुरेश भोळे असतील. नवनिर्वाचित महापौर दीपमाला काळे तसेच माजी महापौर जयश्री महाजन विराजमान उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून, पत्रकारिता क्षेत्रासाठी हा अभिमानाचा क्षण ठरणार आहे.

रवींद्र मोरे यांनी ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रश्नांवर सातत्याने प्रकाश टाकत सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या विषयांवर अभ्यासपूर्ण व परखड लेखन केले आहे. सर्वसामान्यांच्या समस्या मांडताना त्यांनी पत्रकारितेचे सामाजिक उत्तरदायित्व जपले. सत्य, निष्पक्षता आणि जनहितासाठी अखंड झटणाऱ्या त्यांच्या कार्याची दखल घेत आयोजक संस्थांनी त्यांना या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्याचा निर्णय घेतला आहे. या सन्मानामुळे जळगाव जिल्ह्यातील पत्रकार व विचारवंत वर्गात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले व मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा निताताई मंगलसिंग सोनवणे यांनी मोरे यांच्या कार्याचे कौतुक करत, “हा सन्मान त्यांच्या माध्यमातून सत्यनिष्ठ पत्रकारितेला मिळणारा आदर आहे,” अशी भावना व्यक्त केली. रवींद्र मोरे यांच्या या यशामुळे जिल्ह्याच्या पत्रकारितेला नवी उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *