
श्रीक्षेत्र पाडळसरेत येथे आज “नाटेश्वर महादेवाचा” यात्रोत्सव
महादेवाचा नवस फेडण्यासाठी प्रत्येक घरातून दाल बट्टीचा दाखवणार नैवेद्य
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पाडळसरे येथील ग्रामवासीयांचे आराध्य दैवत, पुरातन जागृत देवस्थान व नवसाला पावणारे नाटेश्वर महादेवाचा यात्रोत्सव १२ फेब्रुवारी रोजी पाडळसरे ग्रामस्थांकडून साजरा करण्यात येणार आहे. या ठिकाणी महादेवाला गावरानी तूप व गौरीवर शेकलेली दाल बट्टीचा शाकाहारी नैवेद्य गावातील घराघरातून दाखविण्यात येऊन नवसपूर्ती केली जाणार आहे.
भाविकांच्या नवसाला पावणारे जागृत नाटेश्वर शिवलिंग म्हणून द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रति नाटेश्वर महादेवाचे शिवलिंग व मंदिर विलोभनीय तापी अनेर बोरी नदीच्या मिलन व निसर्गरम्य वातावरणात स्थापित आहे. काळ्या दगडांनी हेमांड पंथीय कलाविष्काराने मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून कोरीव आरेखन घुमटाच्यावर चार उपदिशांना वाघाच्या मूर्ती व त्यावर कळस आणी भागवत धर्माची भगवी पताका व मंदिरात पाषाण शिळा त्यात संगमरवरी लिंग आहे. धुळे व जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर चोपडा, शिरपूर व अमळनेर या तीन तालुक्यांचे सीमेचा केंद्र बिंदूवर सूर्यमुखी मंदिराचा समोर पश्चिम वाहिनी तापी, दक्षिण वाहिनी अनेर व उत्तर वाहिनी बोरी नदीच्या विलक्षण रमणीय नैसर्गिक खोऱ्याच्या परिसरात त्रिवेणी संगमस्थळी नाटेश्वर महादेवाचे शिवलिंग व मंदिर स्थापित आहे. नवसाला पावणारे नाटेश्वर महादेव म्हणून ख्याती असलेले या मंदिराचा जीर्णोद्धार थोर समाजसेविका अहिल्याबाई होळकर यांनी कपिलेश्वर मंदिर जीर्णोद्धार समयी केला असल्याची आख्यायिका आहे. यात्रेच्या दिवशी गावातील सर्व जाती धर्मातील कुटुंबीयांकडून नवस फेडण्यासाठी बोकड बळीची प्रथा पूर्वीपार नसल्याने महादेवाला दाल बट्टीचा शाकाहारी नैवेद्य दाखविला जातो. नवसपूर्तीसाठी येथे भाविक गर्दी करतात. ग्रामवासीयांच्या करमणुकीसाठी पाडळसरे ग्रामपंचायतीने सुकलाल भाऊ बोराडीकर यांचा लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. तर खेळणी, पाळने, उपहारगृह आदींसह विविध वस्तूचे दुकाने दोन दिवसापूर्वी आधीच थाटली आहेत .

Leave a Reply