अमळनेर शेतकरी सहकारी संघासाठी आज मतदान; तिरंगी लढतीत उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाची निवडणूक आज, दि. ३० मे रोजी होत असून मतदानानंतर उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस समर्थित पॅनलमध्ये होत असलेल्या तिरंगी लढतीमुळे निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.

अमळनेर शहरातील सानेगुरुजी विद्यालयात सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. रखरखत्या उन्हामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतदान केंद्रावर व्यक्तिशः मतदारसंघासाठी १६ तर सोसायटी मतदारसंघासाठी १ असे एकूण १७ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी १३५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून पुरेसा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. शेतकी संघाच्या १५ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. आमदार अनिल भाईदास पाटील व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील “सहकार पॅनल”ने १५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. खासदार स्मिता वाघ यांच्या “किसान विकास पॅनल”ने १४ जागांवर, तर काँग्रेसच्या “शेतकरी पॅनल”ने १० जागांवर उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. गेल्या दहा दिवसांपासून उमेदवारांनी कडक उन्हात गावोगावी जाऊन प्रचार केला.

व्यक्तिशः मतदारसंघ (५), महिला राखीव मतदारसंघ (२), इतर मागास वर्ग (१), एससी-एसटी मतदारसंघ (१) आणि एनटी मतदारसंघ (१) अशा एकूण १० जागांसाठी १६ हजार ३९ मतदार आहेत. यापैकी सुमारे ४ हजार ८०० सभासद मयत असून १५०० सभासद बाहेरगावी वास्तव्यास असल्याने ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निवडणूक अधिकच चुरशीची बनली आहे. दरम्यान, या निवडणुकीत सत्ताधारी गटांमध्येच खरी प्रतिष्ठेची लढत रंगली आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या या निवडणुकीकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. अनेक मातब्बर उमेदवार मैदानात उतरल्याने निवडणुकीत आर्थिक उलाढाल वाढल्याचीही चर्चा रंगली असून अंतिम टप्प्यात समीकरणे झपाट्याने बदलत असल्याचे संकेत मिळत आहेत.

 

सोसायटी मतदारसंघात सरळ सामना

 

सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजप समर्थित पॅनलमध्येच थेट लढत होत असून काँग्रेसने या मतदारसंघात उमेदवार दिलेला नाही. या मतदारसंघासाठी १०७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शेवटच्या क्षणी क्रॉस वोटिंगची शक्यता व्यक्त होत असून आर्थिक व राजकीय गणितांवर विजयाचे समीकरण अवलंबून असल्याची चर्चा आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *