
फ्रुटसेल, शेतकी संघाच्या बळकटीकरणासह उद्योग उभारणीसाठी जिल्हा बँकेने पुढाकार घ्यावा : आमदार अनिलदादा पाटील
महायुतीच्या मेळाव्यात जिल्हा बँक निवडणुकीसाठी एकजुटीचे आवाहन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मतदारांनी खासदार आणि आमदारांवर जसे प्रेम दाखवले, तसेच प्रेम जिल्हा बँकेच्या उमेदवारांवर दाखवून त्यांना निवडून द्यावे. भावी संचालकांनी फ्रुटसेल सोसायटी आणि शेतकी संघाचे बळकटीकरण करावे. या संस्थांना कर्ज उपलब्ध करून गोदाम, शीतगृह, स्टार्च कारखाना आणि सूतगिरणी उभारण्यासाठी मदत करावी, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार अनिलदादा पाटील यांनी केले.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रचाराच्या उद्देशाने धुळे रस्त्यावरील कलागुरू मंगल कार्यालयात मतदार आणि कार्यकर्त्यांचा महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार स्मिताताई वाघ म्हणाल्या की, जिल्हा बँक एकेकाळी आशिया खंडातील प्रथम क्रमांकाची बँक होती. आगामी निवडणुकीत चांगले विचार असलेले उमेदवार दिल्याने बँकेवर एकहाती सत्ता येईल आणि बँक निश्चितच प्रगतीपथावर जाईल. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी मागील कालावधीतील बँकेच्या आर्थिक स्थितीवर भाष्य केले. काही कारखान्यांना कर्ज देऊन प्रकल्प उभारण्याचे काम जिल्हा बँकेने केले; मात्र संबंधित संस्था डबघाईला गेल्याने बँकेचे नुकसान झाले. नियोजनाच्या अभावामुळे सुमारे ८०० कोटी रुपयांचे कर्ज आजही थकीत असून, त्यामुळे अनुत्पादित कर्जाचे प्रमाण ५८ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे त्यांनी सांगितले. मावळते चेअरमन संजय पवार म्हणाले की, आज जिल्हा बँकेत ४ हजार ४०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. वेगवेगळ्या सरकारांच्या काळात पीककर्ज धोरणात बदल झाले. पीककर्ज वसुलीचे प्रमाण कमी झाल्याने शेती कर्जातील अनुत्पादित कर्जाचे प्रमाण वाढले. त्यावेळी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी तांत्रिक अडचण दूर केली नसती, तर काही दिवसांपूर्वीच बँकेवर प्रशासक नियुक्त झाला असता. माजी आमदार साहेबराव पाटील यांनी निम्न तापी प्रकल्पातील पाडळसरे धरणाच्या कामाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. खासदार स्मिता वाघ आणि आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या माध्यमातून शासनाने व्याजाची हमी दिल्यास वार्षिकी पद्धतीअंतर्गत जिल्हा बँकेकडून कर्ज घेऊन पाडळसरे धरण पूर्ण होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. मेळाव्यास माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, खासदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, खान्देश शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन डॉ. अनिल शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. व्ही. आर. पाटील, भागवत पाटील, भाजपचे जिजाबराव पाटील, योगेश महाजन, शिवसेनेचे सुरेश पाटील, शेतकी संघाचे चेअरमन संभाजी पाटील, अर्बन बँकेचे माजी चेअरमन मोहन सातपुते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्याचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संजय पुनाजी पाटील यांनी केले, तर जिल्हा बँकेच्या बिनविरोध संचालिका जयश्रीताई पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply