रक्तदान कर्तव्यवम्’ अभियानात अमळनेरचा सेवाविक्रम; तब्बल ६७९ रक्तपिशव्यांचे संकलन

अमळनेर (प्रतिनिधी) अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेतर्फे आयोजित ‘रक्तदान कर्तव्यवम्’ या राष्ट्रव्यापी सेवाभियानांतर्गत तेरापंथ युवक परिषद, अमळनेरच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या रक्तदान अभियानात तब्बल ६७९ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. अमळनेरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि माणुसकीचा प्रेरणादायी संदेश दिला.

या अभियानांतर्गत १७ सप्टेंबर २०२६ रोजी ५५१, २४ सप्टेंबर रोजी ४५ आणि २६ सप्टेंबर रोजी ८३ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. अशा प्रकारे एकूण ६७९ रक्तपिशव्या संकलित झाल्या.

अभातेयूपचे क्षेत्रीय सहयोगी प्रतिक जैन यांनी अभियानाचे प्रभावी प्रतिनिधित्व व समन्वय करत विविध सामाजिक संस्था, संघटना, पदाधिकारी आणि सेवाभावी कार्यकर्त्यांना एका ध्येयासाठी एकत्र आणले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे रक्तदानाचा संदेश अमळनेर क्षेत्रातील विविध घटकांपर्यंत पोहोचला आणि अभियानाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.

या सेवाकार्यात अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना, लायन्स क्लब, अमळनेर, बजरंग व्यायाम शाळा, पानखिडकी, रोटरी क्लब अमळनेर आणि जैन सोशल ग्रुप, अमळनेर यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. याशिवाय विविध संस्था, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि असंख्य रक्तदात्यांच्या सामूहिक सहभागामुळे अभियान यशस्वी झाले. ६७९ रक्तपिशव्या म्हणजे केवळ एक आकडा नसून माणुसकीच्या सेवेसाठी दिलेले ६७९ अमूल्य योगदान असल्याचे तेरापंथ युवक परिषद, अमळनेरने म्हटले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व रक्तदाते, स्वयंसेवक, सामाजिक संस्था, सहकारी संघटना, पत्रकार बांधव, पदाधिकारी आणि अभियानाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जोडलेल्या प्रत्येक सेवाभावी व्यक्तीचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले. “सेवा हीच साधना… रक्तदान हीच माणुसकीची ओळख!” असा संदेशही यावेळी देण्यात आला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *