अवजड वाहनांनी अमळनेरचे रस्ते खिळखिळे; अपघातांचे प्रमाण वाढले

पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) अवजड वाहनांमुळे अमळनेर शहरातील तसेच धुळे मार्गावरील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे आणि उंचवटे निर्माण झाले आहेत. त्यामुळे लहान वाहने, रिक्षा आणि मोटरसायकलस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहने आणि वाळूची वाहने धावत आहेत. चोपडा मार्गाकडून येणाऱ्या रस्त्यावर एका बाजूला मोठे खड्डे तर दुसऱ्या बाजूला उंचवटे निर्माण झाले आहेत. रस्त्याची क्षमता १२ टन असताना ४० ते ५० टन वजनाची वाळू वाहने मोठ्या प्रमाणात वापरली जात असल्याने रस्त्यांची मोठी नासाडी झाली आहे.

दररोज सुमारे ४०० अवजड वाहने या मार्गावरून जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चारचाकी वाहनांच्या चेंबरला धक्के बसत आहेत. रिक्षाचालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत असून एक चाक उंचवट्यावर गेले तरी रिक्षा पलटी होण्याची भीती निर्माण होते.

शनीपेठ भागातील नागरिकांनी सांगितले की, मोटरसायकलस्वारांचे रोज किरकोळ अपघात होत आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांना मोठे झटके बसत असल्याने कमरेचे त्रास तसेच मणक्याच्या समस्याही वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. अवजड वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असतानाही कारवाई होत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्ते अधिक खराब होतील आणि अपघातांचे प्रमाण वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांनी केली आहे.

 

ठेकेदाराला दिल्या सूचना

 

“संबंधित ठेकेदाराला रस्ता दुरुस्त करण्यासंदर्भात सूचना दिली आहे. लवकरच रस्ता दुरुस्तीला सुरुवात होईल.”

सुभाष राऊत , कार्यकारी अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर.

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली माहिती

 

“रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वजनाने वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती तहसीलदार, प्रांताधिकारी, आरटीओ यांना कळवण्यात आली आहे. ठेकेदाराने एकदा दुरुस्ती केली आहे.”

मयूर भदाणे , अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *