
अमळनेरात मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराला प्रतिसाद; ६५० नागरिकांनी घेतला लाभ
अमळनेर (प्रतिनिधी) जिजाऊ बहुउद्देशीय संस्था, अमळनेर, फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुप आणि गोदावरी मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगळग्रह मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवारी (दि. २६) सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात सुमारे ६५० नागरिकांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला.
गेल्या १४ वर्षांपासून जिजाऊ बहुउद्देशीय संस्था आणि फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुप समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत असून, यावर्षीही सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात हृदयरोग, कर्करोग, बालरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, मानसोपचार, कान-नाक-घसा विकार, मूत्रपिंड विकार आदी विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी मोफत तपासणी करून नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच त्रिमितीय इको, ईसीजी, मधुमेह आणि रक्तदाब यांसारख्या महत्त्वाच्या वैद्यकीय तपासण्याही विनामूल्य करण्यात आल्या.
याशिवाय, शिबिरादरम्यान एन्जिओप्लास्टी, बायपास, पेसमेकर तसेच इतर शस्त्रक्रिया किंवा उपचारांसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळू शकणाऱ्या पात्र रुग्णांची निवड करण्याची प्रक्रियाही राबविण्यात आली. यामुळे गरजू रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शिबिरस्थळी ये-जा करण्यासाठी शहरातील विविध ठिकाणांहून मोफत बससेवाही उपलब्ध करून देण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रकाश ताडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. ललिता पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. पाटील, एम्सचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप जोशी उपस्थित होते. शिबिराला अमळनेर शहरासह तालुक्यातील नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या उपक्रमातून सुमारे ६५० रुग्णांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतल्याची माहिती जिजाऊ बहुउद्देशीय संस्था आणि फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. समाजोपयोगी आणि लोकहिताचे असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.

Leave a Reply